संग्रहित फोटो
पुणे : छऱ्याच्या बंदुकीचा धाक दाखवून हॉटेलच्या शेफला लुटणाऱ्या चोरट्यांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. तबरेज उर्फ परवेज मुनीर शेख (वय २२), रमजान अब्बास पटेल (वय २४, रा. शिवनेरीनगर, कोंढवा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत २८ वर्षीय तरुणाने कोंढवा पोलिसांत तक्रार दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार २८ वर्षीय तरुण मूळचा बिहारमधील आहे. तो कोंढव्यात वास्तव्यास आहे. तो येथील एनआयबीएम रस्त्यावरील एका हॉटेलात शेफ आहे. हॉटेलचे काम सकाळी आणि संध्याकाळी अशा दोन सत्रात चालते. शनिवारी (१५ फेब्रुवारी) पहाटे तो कामावर निघाला होता. तेव्हा एनआयबीएम रस्त्यावरील मौर्य हाऊसिंग सोसायटीसमोर आरोपी तबरेज व साथीदार रमजान दुचाकीने आले. दोघांनी त्याला बंदुकीचा धाक दाखविला. त्याच्या डोक्याला बंदूक लावली. तरुणाने प्रतिकार केला असता, त्यांच्यात झटापट झाली. झटापटीत त्याने चोरट्यांकडील बंदूक हिसकावून घेतली. झटापटीत तरुणाचा शर्ट फाटला.
चोरट्यांनी त्याचा मोबाइल हिसकावून नेण्याचा प्रयत्न केला. नंतर तरुण घरी गेला. त्याने हॉटेलच्या वरिष्ठ शेफला घटनेची माहिती दिली. पोलिसांना याबाबतची माहिती कळविण्यात आली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. तरुणाला छऱ्याच्या बंदूकीने धमकावल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी तपास सुरू केला. घटनास्थळावरील सीसीटीव्ही तसेच इतर माहिती घेतली आहे. पोलिसांनी तपास करून पसार झालेल्या परवेज आणि रमजान यांना अटक केली. सहायक पोलीस निरीक्षक मयूर वैरागकर तपास करत आहेत.
रिक्षाचालकाला मारहाण करुन लुटले
दुचाकीस्वार चोरट्यांनी रिक्षाचालकाला मारहाण करून लुटल्याची घटना मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावरील नवले पूल परिसरात घडली आहे. मारहाणीत रिक्षाचालक जखमी झाला असून, पसार झालेल्या चोरट्यांचा शोध घेण्यात येत आहे. युवराज अंबालप्पा भिल्लव (वय २५, रा. धायरी) असे जखमी झालेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. भिल्लव यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. याप्रकरणी दुचाकीवरील तीन चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुण्यात पुन्हा तेच चोरटे ॲक्टीव्ह?
पुण्यातही सहा वर्षांपुर्वी सोनसाखळी चोरट्यांनी मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला होता. दिवसाला तीन ते चार सोनसाखळी चोरीच्या घटना घडत असत. पादचारी महिला तसेच ज्येष्ठ महिला या चोरट्यांच्या टार्गेटवर असत. तीन राज्यात या टोळ्यांनी मोठा गोंधळ घातला होता. पुणे पोलिसांनी तीन राज्यातील माहिती एकत्रित करून या चोरट्यांचा माग सुरू केला होता. नंतर यातील काही टोळ्यांना पकडण्यात यश देखील आले होते. त्यांच्यावर मोक्कासारखी कारवाई देखील केली होती. नंतर या घटना थांबल्या होत्या. परंतु, आता पुन्हा सहा वर्षांनी सोन साखळी टोळ्या ॲक्टीव्ह झाल्याचे गेल्या काही महिन्यांपासून दिसत आहे. त्यामुळे पुन्हा तेच चोरटे ॲक्टीव्ह झाले आहेत का ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.