सौजन्य - नवराष्ट्र टीम
पुणे : वर्षभरापूर्वी पुण्यात झालेल्या वनराज आंदेकर याच्या हत्येचा बदला म्हणून आंदेकर टोळीने आयुष कोमकरला संपवले. 5 सप्टेंबरला गणेश विसर्जनाच्या आदल्या रात्री आठ वाजता पुण्यातील नाना पेठ परिसरात दोन मारेकऱ्यांनी आयुष कोमकर याच्यावर गोळ्या झाडल्या. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला होता. पोलिसांनी काही दिवसाखाली आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर याच्यासह त्याच्या साथीदारांना अटक केली आहे. आता कोमकर हत्या प्रकरणात एक मोठी माहिती समोर आली आहे. बंडू आंदेकर याचा मुलगा कृष्णा आंदेकर हा फरार होता. तो आज समर्थ पोलीस ठाण्यात स्वत: हजर झाला आहे.
कोमकर हत्या प्रकरणातील प्रकरणातील मुख्य सूत्रधार मानला जाणारा कृष्णा आंदेकर बराच काळ फरार होता. दरम्यान, तपास अधिकारी यांनी कृष्णाला फोनवर “तुझा एन्काऊंटर होईल” अशी धमकी दिल्याचा दावा पुढे आला आहे. याआधी न्यायालयात हजर असताना बंडू आंदेकरनेही पोलिसांवर गंभीर आरोप केले होते. “जर कृष्णा पोलिसांसमोर आला नाही तर त्याचा एन्काऊंटर करतील,” असे पोलिस धमकावत असल्याचे त्याने न्यायाधीशांसमोर सांगितले होते. या सर्व घडामोडीनंतर अवघ्या २४ तासांच्या आतच फरार कृष्णा आंदेकर स्वतःहून समर्थ पोलीस ठाण्यात हजर झाला आहे. आत्मसमर्पण केल्यानंतर, कृष्णा आंदेकर यांना वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले आणि नंतर चौकशीसाठी गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आले. कृष्णाला आज न्यायालयात हजर केले जाईल. त्यानंतर पोलिस कृष्णाची चौकशी करण्यावर लक्ष केंद्रित करतील.
आयुषच्या हत्येवेळी नेमकं काय घडलं?
आंदेकर टोळीच्या अमन पठाण आणि यश पाटील यांनी आयुष कोमकरवर जवळपास 12 गोळ्या झाडल्या. त्यापैकी अमन पठाणने जवळपास 8 गोळ्या झाडल्या होत्या. आयुषची हत्या करून तेथून निघाल्यानंतर ‘टपका रे टपका, एक और टपका’ हे गाणे स्पीकरवर लावण्यात आले होते. अर्णवने याविषयी सांगताना म्हटले की, ‘ते गाणे इकडे लागले नव्हते, ते गाणे आंदेकर चौकात लावले होते. आयुषवर हल्ला झाला तेव्हा आई कल्याणी कोमकर आणि बहिण अक्षता कोमकर दोघीही घरात होत्या. गोळ्या झाडून तिथून निघताना दोन्ही मारेकऱ्यांनी म्हटले की, इथे फक्त कृष्णा आंदेकर आणि बंडू आंदेकर चालणार. बाकी कोण नाय. आमच्या नादाला लागणार त्यांचं असंच होणार.’