संग्रहित फोटो
पुणे : राज्यात गुन्हेगारी प्रचंड वाढली आहे. दररोज वेगवेगळ्या भागातून, खून मारामाऱ्या, धमकी, लुटमार यासारख्या घटना उघडकीस येत असतात. गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांकडूनही प्रयत्न केले जात आहेत. अशातच आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. “तुमच्याकडे खूप पैसा आहे, ५० लाख रुपये द्या, अन्यथा ठार मारेन,” अशी धमकी देत व्यावसायिकाकडे खंडणीची मागणी करणाऱ्या आरोपींच्या मुंढवा पोलिसांनी अवघ्या १२ तासांत मुसक्या आवळल्या आहेत. व्हॉट्सॲप कॉलच्या माध्यमातून सतत संपर्क साधून धमक्या दिल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत सापळा रचून घोरपडी येथून आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
अनिकेत अनिल पावल (वय २४, रा. भिमनगर, बिलाल मस्जिद शेजारी, घोरपडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत घोरपडी येथील ४० वर्षीय व्यावसायिकाने मुंढवा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक राजू महानोर यांच्या पथकाने ही कारवाई केली.
तक्रारदार हे घोरपडी येथे वास्तव्यास आहेत. ते लेबर कॉन्ट्रॅक्टर म्हणून कार्यरत आहेत. आरोपी पावल हा त्यांच्याच परिसरात राहतो. त्यामुळे तो त्यांना ओळखतो. पावल चालक म्हणून काम करतो. २६ ते २९ जुलैदरम्यान तक्रारदारांना एका अनोळखी क्रमांकावरून व्हॉट्सॲप कॉल व मेसेजद्वारे संपर्क साधून त्यांना धमक्या दिल्या. “५० लाख रुपये दे, अन्यथा तुझा खून करीन,” असे आरोपी वारंवार सांगत होता. त्यांचावर पाळत ठेवत असल्याबाबत तक्रारीत म्हटले आहे. त्यानुसार सहायक निरीक्षक राजू महानोर यांच्या पथकाने तांत्रिक तपास सुरू केला. त्यात आरोपीने गुन्हा केल्यानंतर आपला मोबाईल बंद करून फरार झाल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, आरोपी घोरपडी येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले.
भीक मागण्यासाठी दोन वर्षांच्या बालिकेचे अपहरण
कात्रज भागातून भीक मागण्यासाठी दोन वर्षांच्या चिमुकलीचे अपहरण केले होते. याचा उलगडा करण्यात भारती विद्यापीठ पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी दोन वर्षांच्या चिमुकलिची धाराशिव जिल्ह्यातून आरोपीच्या तावडीतून सुखरूप सुटका करत पाच जणांना अटक केली आहे. आरोपींमध्ये दोन महिलांचा समावेश आहे. तिला भीक मागण्यासाठी नेल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासातून समोर आले असून, त्यांनी याप्रकारे आणखी कोणत्या लहान मुलांचे अपहरण केले आहे का, यादृष्टीने तपास सुरू केला आहे.