संग्रहित फोटो
कोल्हापूर : खरीप हंगाम जवळ आल्याने शेतकऱ्यांना योग्य बियाणे, खते आणि कीटकनाशके वेळेत उपलब्ध व्हावीत, त्यांच्या फसवणुकीला आळा घालण्यासाठी कृषी विभागाने चांगलीच कंबर कसली आहे. खरीप हंगामात शेतकऱ्यांची फसवणूक करणारे दुकानदार आणि कंपन्यांवर कारवाई करण्यासाठी कृषी विभागाने पथके तयार केली आहेत. अशातचं आता बनावट कीटकनाशकांच्या रॅकेटमधील प्रमुख आरोपींपैकी राजू चेचानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजेंद्र चेचानी याला तेलंगणा पोलिसांनी एका कारवाईदरम्यान अटक केली आहे. पोलिसांनी २ मे २०२५ रोजी राजस्थानातील चित्तोडगड जिल्ह्यातील बस्सी गावातील फार्महाऊसवरून राजू याला अटक केली. स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांच्या सहकार्यांने ही कारवाई केली आहे.
तो सात वर्षांहून अधिक काळ असा अवैध व्यवसाय आणि बेकायदेशीर नेटवर्क चालवत होता. ११ हून अधिक राज्यांमध्ये असलेल्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून त्याने संपूर्ण भारतात बनावट कीटकनाशके तयार आणि वितरित केली. दिल्ली, हरियाणा, राजस्थान, पंजाब, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक येथे कार्यरत असलेल्या सहकाऱ्यांच्या विस्तृत नेटवर्कद्वारे प्रतिष्ठित कृषी रसायन कंपन्यांचे लेबल लावलेली बनावट उत्पादने त्याने पुरवली. असा चेचानीवर आरोप आहे.
प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, बस्सी येथे चेचानीचे महेश्वरी सीड्स अँड पेस्टिसाइड्स नावाने एक दुकान आहे. नियमांचे उल्लंघन करत पॅकेजिंग मटेरियल आणि तयार बनावट उत्पादनांचा तो कथितरित्या प्रमुख पुरवठादार असल्याचे समजते.
हैदराबादमधील नियमबाह्य काम करणाऱ्या ई राजेशच्या गोदामात जुलै २०२४ मध्ये बनावट कीटकनाशके सापडल्यानंतर कीटकनाशक कायद्यांतर्गत एलबी नगर पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या एफआयआर च्या आधारे ही अटक करण्यात आली आहे. अधिक तपासात अन्य राज्यांमध्ये चेचानीविरुद्ध दाखल केलेले अनेक गुन्हे उघडकीस आले आहेत.