सांगली : विश्रामबाग, संजयनगर परिसरात घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने गजाआड केले आहे. टोळीतील एक आरोपी पसार झाला आहे. संशयित चोरीचे सोने विकण्यासाठी मिरज मार्केट परिसरात आले होते. त्यांच्याकडून चार घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले असून, ४ लाख ६४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सुदर्शन सुनील यादव (वय १९, रा. भोसे, ता. मिरज), मुनीब मुश्ताक भाटकर (वय १९, रा. आंबा चौक, यशवंतनगर, सांगली) व दीपक गंगाप्पा आवळे (वय २०, रा. शंभरफुटी रोड, गुलाब कॉलनी, सांगली) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत, तर अक्षय ऊर्फ पिंट्या दोडमणी (रा. वाडे फाटा, सातारा) हा पसार आहे.
पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी मालमत्तेविरुद्धचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला दिले होते. यासाठी पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांनी सहायक निरीक्षक संदीप शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पथक नियुक्त केले होते. या पथकातील पोलिस शिपाई संकेत कानडे, अभिजित माळकर, ऋषिकेश सदामते यांना मिरजेतील मार्केट यार्डात संशयित सुदर्शन यादव, मुनीब भाटकर, दीपक आवळे हे तिघे चोरीतील सोने विकण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानूसार पथकाने मार्केट यार्ड परिसरात सापळा रचला. तेथील शेतकरी भवनसमोर संशयित तिघे थांबले असताना सहायक निरीक्षक संदीप शिंदे व पथकाने त्यांना ताब्यात घेतले. संशयित तिघांना विश्रामबाग पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे.
दागिने चोरल्याची कबुली
संशयितांची झडती घेतली असता सुदर्शन यादव याच्याकडील पिशवीत सोन्या-चांदीचे दागिने व इतरांकडे रोकड मिळाली. पथकाने कसून चौकशी केली असता, कर्नाळ रस्त्यावरील मंगेशनगर, भारत सूतगिरणी, विजयनगर चौक, विठ्ठलनगर, गांधी हायस्कूल येथून दिवसा व रात्री घरफोडी करून दागिने चोरल्याची कबुली दिली. चौथा संशयित पिंट्या दोडमणी पसार आहे. पोलिसांनी तिघांकडून ४ लाख २४ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, १८ हजार ५०० रुपयांचे चांदीचे दागिने, २१ हजार ७०० रुपयांची रोकड, असा ४ लाख ६३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
हे सुद्धा वाचा : माळशिरसमध्ये पोलीस हवालदार ACB च्या जाळ्यात; आठ हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले
संशयित चोरटे सराईत गुन्हेगार
घरफोडीतील संशयित चोरटे सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर सांगली शहर, विश्रामबाग, संजयनगर, तासगाव, कराड येथील पोलिस ठाण्यांमध्ये विविध गुन्हे दाखल आहेत. यातील सुदर्शन यादव हा विश्रामबाग, कराड येथील दोन्ही गुन्ह्यात संशयित असून तो पसार होता. त्याला पकडण्यात पोलिसांना यश आले.