संग्रहित फोटो
कराड : सैदापूर (ता. कराड) येथे जिव्हाळा ढाब्यासमोरील अपार्टमेंटमध्ये असलेल्या बनावट दारूच्या कारखान्यावर पोलिसांनी छापा टाकला आहे. बुधवारी सायंकाळी करण्यात आलेल्या या कारवाईत पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून ११ लाखांचा मुद्देमाल आणि बनावट दारूच्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्या आहेत. मयूर कृष्णदेव कदम (रा. करवडी, ता. कराड), विजय शिवाजी निगडे (रा. शिरवळ, ता. कराड), व मंदार कृष्णदेव कदम (रा. करवडी) अशी याप्रकरणी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, सैदापूर येथील जिव्हाळा ढाब्यासमोरील एका अपार्टमेंटमध्ये बनावट दारू तयार केली जात असल्याची माहिती कराड शहर पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी बुधवारी सायंकाळी त्या ठिकाणी छापा टाकला. पोलिसांनी तेथून १० लाख ५० हजार रूपये किंमतीच्या दोन कार, १० हजार ५०० रूपये किंमतीचे २१० लिटर स्पीरीट, एक हजार ७०० रुपये किंमतीचे टैंगो इसेन्स, एक हजार ५०० रुपये किंमतीचे फिल्टर, दोन हजारांची पाण्याची टाकी, बनावट दारूच्या बाटल्या असा १२ लाख ३८ हजार ५५० रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. याबाबत पोलिस कॉन्स्टेबल दिग्विजय सांडगे यांनी कराड शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
अपार्टमेंटमध्ये बेकायदेशीर व्यवसाय
या कारवाईत पोलिसांना अपार्टमेंटमध्ये बेकायदेशीररीत्या दारू तयार केली जात असल्याचे दिसून आले. छाप्यावेळी अपार्टमेंटसमोर उभ्या असलेल्या दोन कारमध्ये दारूने भरलेले कॅन होते. यावेळी पोलिसांनी त्या ठिकाणी थांबलेल्या तीन जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली. चौकशीवेळी तिघांनीही रसायनमिश्रीत बनावट दारू तयार करीत असल्याचे सांगितले.