संग्रहित फोटो
पुणे : सिंहगड भागातील एका बांधकाम व्यावसायिकाला पिस्तुलाचा धाक दाखवून तुला मारायची ३० लाखांची सुपारी मिळाली आहे, अशी धमकी देत ५० हजार रुपयांची खंडणी मागण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. खंडणी मागणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. दोघेही सराईत गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
दादा मोरे (वय २४), किरण शिंदे (वय २६, दोघे रा. वडगाव बुद्रुक) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून पिस्तुल देखील जप्त केले आहेत. याबाबत अजय कचरु खुडे (वय ४५, रा. आनंदविहार, हिंगणे खुर्द) यांनी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना सिंहगड रोडवरील दामोदरनगर येथे ४ जुलै रोजी रात्री ९ व ६ जुलै रोजी दुपारी घडली होती.
पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार अजय खुडे हे त्यांच्या ३ मित्रांसह त्यांच्या कार्यालयात गप्पा मारत बसले होते. त्यावेळी दादा मोरे व किरण शिंदे कार्यालयात आले. त्यांनी कार्यालयाचे शटर खाली करुन खुडे यांच्या मित्रांना शिवीगाळ केली व हाताने मारहाण केली. दादा मोरेने त्याच्याकडील पिस्तुल काढून धमकावले. तेव्हा अजय खुडे यांनी त्याला काय झाले असे विचारले. त्यावर दादा मोरेने तुला मारायची ३० लाखांची सुपारी आली आहे, असे सांगून मित्रांना बाहेर काढायला सांगितले.
आता तुझ्याकडे काय आहे, ते काढून दे, असे म्हणून धमकाविले. नंतर कार्यालयाचे शटर उघडून त्यांना पुन्हा पिस्तुल दाखवून त्यांच्या दुचाकीवर बसण्यास सांगितले. दादा मोरेने खुडे यांना तुला आता गुडलक म्हणून टोकन द्यावे लागेल, असे म्हणून निघून गेले. त्यानंतर ६ जुलै रोजी दुपारी त्यांना किरण शिंदेने फोन करुन ५० हजार रुपये आणुन दे, नाही तर तु कोठे आहेस तेथे मी व दादा मोरे येऊन तुला बघुन घेतो व पोलिसात जाऊ नको, अशी धमकी दिली. त्यानंतर अजय खुडे यांनी पोलिसांकडे तक्रार दिली.
अजय खुडे हे बांधकाम व्यावसायिक आहेत. दादा मोरे व किरण शिंदे हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वी गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी दोघांना अटक केली असून, त्यांच्याकडील पिस्तुल जप्त केले आहे, असे वरिष्ठ निरीक्षक दिलीप दाईगडे यांनी सांगितले. अधिक तपास सहायक निरीक्षक कदम करीत आहेत.
घरात घुसून तोडफोड केल्याप्रकरणी गुन्हा
घरात झोपलेले असताना दरवाजावर लोखंडी हत्याराने मारून व घरातील साहित्याची तोडफोड करत धमकावल्या प्रकरणी एका अल्पवयीन मुलासह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिव सचनिसगी बावरी (२०) याला याप्रकरणी अटक केली असून, अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत रोहित सिद्धार्थ शिवशरण (२६, रा. रामटेकडी) यांनी तक्रार दिली. हा प्रकार वानवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रामटेकडी परिसरातील अदिनाथ सोसायटी येथे ६ जुलै रोजी मध्यरात्री घडला आहे.