संग्रहित फोटो
पुणे : राज्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागात गुन्हेगार धुमाकूळ घालत आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण होत आहे. अशातच आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. खूनाच्या गुन्ह्यातून जामीनावर बाहेर आलेल्या तीन गुन्हेगारांनी इतरांना सोबत घेऊन बेकायदेशीर जमाव जमवत एका नियोजित गृहप्रकल्पात बेकायदेशीररित्या प्रवेश करण्याचा प्रयत्न करत ५ लाखांची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे.
पोलिसांनी याप्रकरणी चौघांना अटक केली असून, इतर फरार झाले आहेत. राजु तुकाराम अस्वले (वय २७, रा. चंदननगर), हिमेश सुभाष मोरे (वय १८), आकाश संजय मोरे (वय २४), अंकुश अशोक अडसूळ (वय २८, रा. चंदननगर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर, त्यांचे इतर सहा ते सात साथीदार पसार झाले आहेत. याबाबत ५१ वर्षीय सुरक्षा रक्षकाने तक्रार दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार लष्करातून लेफ्टनंट म्हणून निवृत्त झाले आहेत. त्यांची सुरक्षा कंपनी आहे. दरम्यान, खराडी येथील सर्वे. नं. ४२ मधील इवॉन खराडी इन्फ्रास्टक्चर प्रा. लि. चे नियोजित गृहप्रकल्प सुरू आहे. याठिकाणी आरोपी बेकायदेशीर जमाव जमवून आले. त्यांनी आरडाओरडा करत दहशत माजवली. तसेच, कंपाऊंडमध्ये घुसण्याचा प्रयत्न करून तेथील मालकाला ५ लाख रुपयांची खंडणी मागितली व धमकावले, असे तक्रारीत म्हंटले आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी याठिकाणी धाव घेत पसार झालेल्या चौघांना बेड्या ठोकल्या असून, इतरांचा शोध सुरू आहे. यात तीन आरोपी हे खूनाच्या गुन्ह्यात जामीनावर बाहेर आलेले आहेत.
लहान मुलांसमोरच पतीनं केली पत्नीची हत्या
पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना मंगळवारी (५ ऑगस्ट) रात्री खराबवाडी, ता. खेड येथे घडली आहे. याप्रकरणी एका महिलेने महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी सचिन रामआसरे यादव (२३, अलाहाबाद, उत्तरप्रदेश, सध्या चाकण, ता. खेड) याला अटक करण्यात आली आहे. आरोपी सचिन हा त्याची पत्नी गॅलरीत उभे राहून इतर पुरुषांकडे पाहत असल्याचा संशय घेत होता. यावरून तो पत्नीला सतत भांडण करून मारहाण करायचा. घटनेच्या दिवशी त्याने दिवसभर भांडण केले आणि सायंकाळी पत्नीला प्लास्टिकचे स्टूल, लाकडी बेलणे, पीव्हीसी पाईप आणि काठीने दोन्ही पाय, दोन्ही हात आणि डोक्यावर मारहाण केली. तसेच पत्नीच्या पोटाला चाकू लावून जीवे मारण्याची धमकी दिली आणि तिला मारून टाकले. जेव्हा मयताचा मुलगा प्रिन्स आणि मुलगी पलक यांनी तिला वाचवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांनाही दमदाटी केली आणि मुलाला पाठीत लाकडी बेलण्याने मारले. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.






