संग्रहित फोटो
पुणे : बिबवेवाडीतून दोन कोटींसाठी हिऱ्याच्या व्यापाऱ्याचे अपहरणाचे प्रकरण बनावच असल्याचे समोर आले आहे. पोलिसांच्या एका दमात व्यापारी चार दिवसानंतर स्वत:हून बिबवेवाडी पोलिसांकडे हजर झाला. आर्थिक देवाण-घेवाणीतून व्यापाऱ्याने पत्नीच्या मदतीने अपहरणाचा बनाव रचल्याचे समोर आले आहे. आता पोलिसांची दिशाभूल केल्याप्रकरणी पोलीस कारवाई करणार असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. जिथल जितेंद्र शहा (वय ३५, रा. बिबवेवाडी) असे या व्यापाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी बिबवेवाडी पोलिसांत अपहरणाप्रकरणी गुन्हा नोंद आहे.
माहितीनुसार, जिथल हे हिऱ्याचे व्यापारी आहेत. बिबवेवाडी परिसरात राहण्यास आहेत. दरम्यान, सोमवारी (४ मार्च) ते व त्यांची पत्नी मुलीला शाळेत आणण्यास सॅलिसबरी पार्क येथे गेले होते. कारने सोसायटीत आले. नंतर लष्कर भागात कामानिमित्त जाणार आहे, असे सांगून जिथल दुचाकीने कॅम्पात आले. नंतर सायंकाळी सहाच्या सुमारास पत्नीला जिथल यांच्याच फोनवरून संपर्क साधला व ‘मैने आपके पतीको उठाया है, दो करोड तयार रखो, आपके ससूरजी को बोलो, दो घंटेमें फोन करेंगे’ अशी धमकी दिली गेली होती, अशी तक्रार पोलिसांकडे करण्यात आली होती.
गुन्हे शाखेची पथके व बिबवेवाडी पोलीस व्यापारी व अपहरणकर्ते यांचा शोध घेत होते. मात्र, सीसीटीव्ही तसेच तांत्रिक तपास केल्यानंतर वेगळीच शंका पोलिसांना आली. व्यापाऱ्याचे लोकेशन नर्हेत आले होते. तर दुचाकीही त्याठिकाणी मिळाली. तो कात्रज परिसरात पायी चालत जात असताना सीसीटीव्हीत कैद झाला होता. त्यामुळे हे अपहरण नसून बनाव असल्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. त्यादृष्टीने तपास सुरू केल्यानंतर जिथल ज्यांच्या-ज्यांच्या संपर्कात होते, त्यांच्याकडे चौकशी केली. साधारण दहा व्यक्तींच्या जिथल संपर्कात होते. त्यानूसार, कसून तपास केला. त्यात जिथल अपहरणानंतर देखील एका व्यक्तीच्या संपर्कात असल्याचे समोर आले. पोलिसांनी पोलीस खाक्याच्या एक दमात त्याला पोलीस ठाण्यात या, अन्यथा आम्ही येऊ, असा निरोप त्याच व्यक्तीमार्फत पाठविला. त्यानंतर स्वत:हून जिथल हे शुक्रवारी पोलीस ठाण्यात हजर झाले.
विर्ले-पार्ले लॉजमध्ये आराम…
जिथल कात्रजमधून प्रवासी गाडीने मुंबईत गेले. नंतर ते विर्ले-पार्ले येथे गेले. त्याठिकाणी एका लॉजमध्ये त्यांनी रूम बुक करून चार दिवस मुक्काम ठोकल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. आरामात राहून पुण्यातील एका व्यक्तीच्या संपर्कात होते. पुण्यात नेमके काय चालले याची माहिती घेत होते. पोलिसांना खबर लागली आणि पोलिसांनी त्यांना हजर होण्यास सांगितले. आर्थिक देणे आहेत. त्यातून त्यांनी हा बनाव रचला असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्यांच्याकडे सायंकाळपासून चौकशी सुरू असल्याची माहिती देण्यात आली.