सौजन्य - नवराष्ट्र टीम
बारामती : इंदापूर तालुक्यातील न्हावी गावाच्या शिवारात शेती मालात अंमली पदार्थाच्या निर्मितीसाठी बेकायदेशीर विनापरवाना लागवड करण्यात आलेल्या अफुच्या शेतीवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. एकूण २७ लाख ५६ हजार ४६० रूपये किंमतीची सुमारे ८८३ किलो ग्रॅम वजनाची बोंडासह अफुची झाडे हस्तगत करून तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. स्थानिक गुन्हे शाखा व वालचंदनगर पोलिसांनी ही कारवाई केली.
अंमली पदार्थ वनस्पतींची बेकायदेशीर विनापरवाना लागवड करून उत्पादन घेवून विक्री केल्यामुळे कमी कालावधीत झटपट पैसा कमविता येतो, अशी धारणा लोकांमध्ये तयार झाली आहे. यातूनच कायद्याचा भंग करून काही लोक शेतीच्या नावाखाली शेती मालात अफु, गांजासारख्या अंमली पदार्थ निर्मिती करणाऱ्या वनस्पतींची बेकायदेशीरपणे विनापरवाना लागवड करून उत्पादन घेत आहेत.
जिल्हयाचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी अंमली पदार्थाचे उत्पादन, साठा, विक्री, सेवन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश पुणे ग्रामीण पोलीसांना दिले होते. त्यानुसार बारामती उपविभागात गुन्हे प्रकटीकरणाचे काम पाहणारे स्थानिक गुन्हे शोध पथक, वालचंदनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध व्यवसायांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत असताना २१ फेब्रुवारी २०२५ रोजी या पथकातील पोलिस हवालदार स्वप्निल अहीवळे यांना गोपनीय माहितीमार्फत न्हावी (ता. इंदापूर) गावच्या हद्दीत रतन कुंडलिक मारकड व बालु बाबुराव जाधव यांनी त्यांच्या मालकीच्या शेतात बेकायदेशीरपणे विनापरवाना अफुच्या झाडांची लागवड विक्री करण्याच्या उद्देशाने करून उत्पादन घेतले आहे, अशी माहिती मिळाली.
सदर माहितीचा आशय पोलीस निरिक्षक अविनाश शिळीमकर यांनी पोलीस अधीक्षक यांना सांगितला. त्यांच्याकडून कारवाईचे आदेश प्राप्त करून संशयितांच्या शेतात जावून पाहणी करून कारवाई केली असता, शेतामध्ये उपस्थित रतन कुंडलिक मारकड (वय ५० वर्षे), बाळु बाबुराव जाधव, ( वय ५४ वर्षे, दोघे रा. न्हावी) यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांनी शेतांमध्ये अफुची बेकायदेशीर विनापरवाना लागवड केल्याचे आढळून आले, त्या दरम्यान त्याच परिसरातील कल्याण बाबुराव जाधव (वय ६५ वर्षे रा. न्हावी) हे शेतात उपस्थित असताना त्या शेताची पाहणी केली असता त्यांच्या शेतांमध्ये देखील अफुची बेकायदेशीर विनापरवाना लागवड केल्याचे आढळून आल्याने त्यांना देखील ताब्यात घेण्यात आले.
अफुची लागवड केलेली दिसून येवू नये, याकरीता शेतात कांदा व लसूण पिकांची लागवड करून चहुबाजूने मका या पिकाचे उत्पादन घेण्यात आलेले होते. कारवाई दरम्यान एकूण २७ लाख ५६ हजार ४६० रूपये किंमतीची सुमारे ८८३ किलो ग्रॅम वजनाची बोंडासह अफुची झाडे हस्तगत करण्यात आली. या तिघांविरोधात वालचंदनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.