सौजन्य - नवराष्ट्र टीम
इचलकरंजी : इचलकरंजीमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. इचलकरंजी पोलीसांनी नशेची इंजेक्शन विकणारी मोठी साखळी उदध्वस्त केली आहे. नशेसाठी वापरणाऱ्या मेफेंटरमाइन सल्फेट इंजेक्शनची विक्री करणाऱ्या तिघांना ताब्यात घेतले आहे. संग्राम अशोकराव पाटील (वय २९ रा. वृंदावन अपार्टमेंट, श्रीपाद नगर), सचिन सुनिल मांडवकर (वय २५ रा. यशवंत कॉलनी) आणि अभिषेक गोविंद भिसे (वय २५ रा. लालनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून नशेसाठी वापरण्यात येणाऱ्या मेफेंटरमाइन सल्फेट इंजेक्शनच्या ५२ बाटल्या व ६० हजाराची रोकड, ३ मोबाईल व २ दुचाकी असा २ लाख ३६ हजार ९६४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या कारवाईमुळे नशेची इंजेक्शन विकणारी मोठी साखळी उदध्वस्त करण्यात इचलकरंजी पोलीसांना यश आले आहे.
पोलीस अधीक्षक यांनी कोल्हापूर जिल्ह्यात “मिशन झिरो ड्रग्ज अंतर्गत” कारवाई करण्याबाबत आदेश दिले आहेत. त्यानुसार इचलकरंजी पोलीस ठाणे हद्दीत काही लोक नशा करण्यासाठी मेफेंटरमाइन सल्फेट इंजेक्शनची विक्री करीत असल्याची माहिती पोलीसांना प्राप्त झाली. इचलकंरजी पोलीसांनी सदर प्रतिबंधित इंजेक्शनचा साठा बाळगणाऱ्या श्रीपादनगर येथील वृंदावन अपार्टमेंटमधील संग्राम पाटील याच्या घराबाहेर सापळा रचला.
मिळालेल्या माहितीनुसार संग्राम पाटील याच्या घरातून सचिन मांडवकर हा बाहेर येतान दिसला. त्याला ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यात मेफेंटरमाइन सल्फेट इंजेक्शनच्या ५ बाटल्या मिळून आल्या. त्यानंतर लगेचच पोलिसांनी संग्राम पाटील याच्या घरी छापा टाकून शोध घेतला असता मेफेंटरमाइन सल्फेट इंजेक्शनच्या १८ बाटल्या मिळून आल्या. दोघांकडे अधिक चौकशी केली असता लालनगर येथील अभिषेक भिसे याच्याकडेसुद्धा मेफेंटरमाइन सल्फेट इंजेक्शनचा साठा असल्याचे सांगितले.
दरम्यान त्यावरून भिसे याला सदर प्रतिबंधीत इंजेक्शन घेवून येण्यास सांगून सापळा रचून पकडले. त्यावेळी त्याच्याकडे प्रतिबंधीत इंजेक्शनच्या ७ बाटल्या मिळून आल्या. त्यांनतर त्याच्या घरी छापा टाकून शोध घेतला असता मेफेंटरमाइन सल्फेट इंजेक्शनच्या २२ बाटल्या तसेच रोख रक्कम ६० हजार मिळून आले. या तिघांना अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, या साखळीतील अन्य संशयिताचा शोध सुरु आहे.
ही कारवाई संयुक्त पोलीस पथकाने केली आहे. इचलकरंजी शहरात नशेच्या इंजेक्शन अथवा अंमली पदार्थाचे सेवन किंवा विक्री बाबतीत कोणतीही माहीती प्राप्त झाल्यास पोलीसांना गोपनीय माहीती देवून मिशन झिरो ड्रग्ज हे अभियान यशस्वीरित्या राबवण्यासाठी व अंमली पदार्थाचे समुळ उच्चाटन करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधिकाऱ्यांनी केले आहे.