सौजन्य - नवराष्ट्र टीम
सातारा : बनावट तणनाशक तयार करणाऱ्या टोळीचा शाहूपुरी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. करंजे नाका येथे आठ जुलै रोजी दुपारी चार वाजता सापळा रचून सहा जणांना ताब्यात घेतले आहे. शाहूपुरी पोलिसांची ही अत्यंत महत्वाची कारवाई मानली जात आहे. २ लाख ६ हजाराच्या बायर कंपनीच्या बनावट औषधाच्या २६० बॉटल, १ लाख रुपये किमतीचा टाटा कंपनीचा टेम्पो, रेवडी, फलटण व वडूज येथील कारखान्यातून तब्बल १२ लाखाची बनावट राऊंडअप औषधे जप्त केली आहेत.
धैर्यशील अनिल घाडगे (वय ३१ रा, साई वैष्णव अपार्टमेंट, समता कॉलनी शाहूपुरी), युवराज लक्ष्मण मोरे (वय २८, रेवडी, ता. कोरेगाव), गणेश मधुकर कोलवडकर (वय ३०, रा. घालवड, ता. फलटण, जि. सातारा), नीलेश भगवान खरात (वय ३८, रा. जाधववाडी, ता. फलटण), तेजस बाळासो ठोंबरे (वय ३०, रा. वडूज तालुका खटाव), संतोष जालिंदर माने (वय ४५, रा. नढवळ, ताल. खटाव, जि. सातारा) या सहा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिस उपनिरीक्षक संजय ढमाळ अधिक तपास करत आहेत.
या कारवाईत सुरेश घोडके, मनोज मदने, नीलेश काटकर, ज्योतीराम पवार, महेश बनकर, अभय साबळे, सचिन पवार, स्वप्निल सावंत, स्वप्निल शिंदे, सुमित मोरे, संग्राम फडतरे, रोहित बाजारे, जयवंत घोरपडे यांनी सहभाग घेतला होता.
करंजे नाका परिसरात लावला सापळा
शाहूपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, शाहूपुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांना करंजे नाका येथे बनावट तन नाशक औषध विक्री करण्यासाठी एक टोळी येणार असल्याची माहिती मिळाली होती. पोलिस उपनिरीक्षक संजय ढमाळ व गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने करंजे नाका परिसरात आठ जुलै रोजी सायंकाळी चार वाजता सापळा रचला. करंजे नाका येथे मोळाचा ओढा या बाजूने येणारा एक टेम्पो पोलिसांनी संशयावरून अडवला. गाडी चालकाला त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव धैर्यशील घाडगे असे सांगितले.
रेवडी, फलटण, दहिवडीत कारखाना
पथकातील कर्मचारी व टू बडी कन्सल्टिंग कंपनीचे असिस्टंट मॅनेजर सतीश पिसाळ यांनी गाडीतील औषधे चेक केली असता ती औषधे बनावट असून ती बायर राऊंड अप नावाने विकली जाणार होती. अशी माहिती समोर आली. त्यानुसार, पोलिस उपनिरीक्षक ढमाळ यांनी गाडी चालकासह टेम्पो ताब्यात घेऊन पंचांसमक्ष पंचनामा केला. यामध्ये दोन लाख सहा हजार रुपये किमतीचे बायर कंपनीच्या बनावट औषधाच्या २६० बॉटल व एक लाख रुपये किमतीचा टेम्पाे असा मुद्देमाल जप्त केला.