सौजन्य - सोशल मिडीया
बारामती : सध्या कांद्याचे दर कोसळले आहेत, दुधाला दिले जाणारे अनुदान वेळेवर येत नाही, त्यामध्ये खर्च देखील निघत नाही, त्यामुळे कांदा व दुधाला दरवाढ मिळल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नसून, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी, याबाबत आपण केंद्राच्या अर्थसंकल्पात मागणी करणार असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
बारामती शहरातील तीन हत्ती चौक या ठिकाणी कांदा व दुधाला दरवाढ मिळण्याच्या मागणीसाठी खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी दुधाचे पाऊच व कांदे नागरिकांना वाटून अनोखे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात खासदार सुळे बोलत होत्या. यावेळी युवा नेते युगेंद्र पवार, एस. एन जगताप, संदीप गुजर, सत्यव्रत काळे, वनिता बनकर, आरती शेंडगे आदींसह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी खासदार सुळे म्हणाल्या, विधानसभा निवडणूक संपल्यानंतर सरकार स्थापन होऊन मंत्रिमंडळ बनवण्यामध्ये एक महिना निघून गेला. मात्र मायबाप जनतेकडे बघण्यास या सरकारला वेळ नव्हता. सरकार स्थापन होऊन दीड ते दोन महिने झाले तरी शेतकऱ्यांबाबत ठोस निर्णय झालेला नाही. आम्हाला फक्त विरोधाला विरोध करायचा नाही, राज्यात प्रचंड महागाई वाढली आहे. शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. सरकारने शेतकऱ्यांना दुधासाठी जे अनुदान दिले होते, ते वेळेवर येत नाही, त्या अनुदाना मध्ये खर्च निघत नाही. दुधाला अनुदान देण्याऐवजी चाळीस रुपये प्रति लिटर दर द्यावा, ही दूध उत्पादकांची मागणी आहे. याबाबत आम्ही सरकार बरोबर कधीही चर्चा करण्यासाठी तयार आहोत.
शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आमची सहकार्याची भावना आहे. शेतकऱ्यांकडून माहिती घेऊन सरकारने याबाबत निर्णय घ्यावा हीच आमची अपेक्षा आहे. मात्र सरकार दरबारी गेल्यानंतर आम्हाला कोणताही न्याय मिळाला नाही, त्यामुळे रस्त्यावर उतरण्याची वेळ आमच्यावर आली आहे. कृषिमंत्री दादा भुसे यांची मुंबईमध्ये भेट झाल्यानंतर मी कांद्यावरील निर्यात शुल्क 20 टक्के वरून शून्य टक्के करावा,शेतकऱ्यांना हमीभाव द्यावा, अशी आग्रही मागणी आपण त्यांना केले आहे. महाराष्ट्र सह देशातील शेतकऱ्यांना शेती परवडत नाही. उद्योजकांना त्यांच्या थकीत कर्जासाठी त्यांचे कर्ज माफ अथवा त्यांना सूट देण्यासाठी हेअरकट दिला जातो, त्याप्रमाणे शेतकऱ्यांना देखील हेअर कट देऊन सरसकट कर्जमाफी करावी, याबाबत आपण अर्थसंकल्पात मागणी करणार असल्याचे खासदार सुळे यांनी सांगितले. सत्तेवर आल्यानंतर दुधासह कांदा, सोयाबीन व कापसाला हमीभाव देण्याचे आश्वासन या सरकारने दिले होते. तो शब्द त्यांनी पाळावा याची आठवण त्यांना आम्ही या आंदोलनाच्या माध्यमातून करून देत असल्याचे सांगून खासदार सुळे म्हणाल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेऊन या मागण्या त्यांच्या पुढे आम्ही मांडणार आहोत. असंही सुळे म्हणाल्या.
हे सुद्धा वाचा : गृहिणींना मोठा दिलासा! आठवडाभरात लसूण, कांद्याचे दर उतरले; सध्या किंमत किती?
योगेंद्र पवार यांनी आपल्या भाषणात सांगितले की, ज्येष्ठ नेते शरद पवार केंद्रात कृषी मंत्री असताना दुधाला कधीही एवढा दर मिळाला नव्हता, तेवढा उच्चांकी दर मिळाला, कांद्याला देखील त्यांच्या कार्यकाळात उच्चांकी दर मिळाला. महाराष्ट्रासह देशात शेतकऱ्यांसाठी चांगले कोणी काही केला असेल ते पवार साहेबांनी केले आहे, असे पवार यांनी सांगितले. जिरायती भागात खासदार सुप्रिया सुळे यांनी दौरा केल्यानंतर त्या भागातील शेतकऱ्यांनी दुधासह कांद्याला दरवाढ मिळावी अशी आग्रही मागणी सुळे यांच्याकडे केली आहे. शेतकऱ्यांच्या या प्रश्नासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो असल्याचे युगेंद्र पवार यांनी सांगितले. प्रास्ताविकात एस एन जगताप यांनी आंदोलनाची माहिती दिली. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांची घोषणाबाजी केली.