सोन साखळी चोरांना अटक (फोटो- सोशल मिडिया)
पुणे: शहरात सोन साखळी चोरट्यांनी धुमाकूळ घातलेला असताना वाघोली पोलिसांना सोन साखळी चोरट्यांना पकडण्यात यश आले आहे. त्यांच्याकडून चार गुन्ह्यांची उकल झाली आहे. दरम्यान, पाच जणांची टोळी असल्याचे समोर आले असून, ते दुचाकी चोरून त्या दुचाकीवर सोन साखळी चोरत असल्याचे समोर आले आहे. तर, यातील एक नाशिक पोलिसांना ३ गुन्ह्यात पाहिजे असलेले आरोपी असल्याचेही समोर आले आहे.
प्रशांत संतविजय यादव (वय १९, रा. नाशिक), कुणाल विश्वनाथ साबळे (वय २१), ताजीम सल्ला उद्दीन अन्सारी (वय २०) तसेच संजोग संतोष भांगरे (वय १८) व मनोज उदय पाटील (वय ३१, रा. सर्व नाशिक शहर) यांना अटक केली आहे. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक युवराज हांडे, उपनिरीक्षक मनोज बागल व त्यांच्या पथकाने केली आहे.
शहरात सोन साखळी चोरीचे गुन्हे सातत घडत असून, सरासरी तीन दिवसाला एक घटना घडत आहे. परंतु, त्यातील चोरटे मात्र पोलिसांना हाती लागत नसल्याचे दिसत आहे. ज्येष्ठ महिला व पादचारी महिला चोरट्यांकडून टार्गेट केले जात आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक पोलीस व गुन्हे शाखेच्या पथकांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. यादरम्यान, वाघोली पोलिसांकडे दाखल गुन्ह्याचा तपास करताना पोलीस अंमलदार साईनाथ रोकडे व दिपक कोकरे यांना बातमीदारामार्फत आरोपींबाबत माहिती मिळाली होती. त्यानूसार, त्यांना पकडण्यात आले.
नाशिकवरून पुण्यात येऊन चोऱ्या
सर्व आरोपी नाशिक शहरातील वेगवेगळ्या भागातील रहिवाशी आहेत. प्रशांत व ताजीम हे सराईत आहेत. नाशिकवरून आरोपी पुण्यात येऊन वेगळ्या भागातून दुचाकी चोरत होते. नंतर त्याच दुचाकीवरून ते चोऱ्या करत असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, ताजीम अन्सारी हा नाशिक पोलिसांना पाहिजे आरोपी आहे. त्याच्यावर गंगापूर, म्हसरूळ व सातपूरा पोलिसांत गुन्हे नोंद आहेत.
प्रशांत यादव हा सराईत गुन्हेगार आहे. प्रशांतने कुणाल साबळेच्या मदतीने दौंडमधून एक दुचाकी चोरली. वाघोलीत त्याच दुचाकीवरून दोघांनी सोन साखळी हिसकावली. तर, दुसऱ्या घटनेत त्याने ताजीम अन्सारी याच्या साथीने कोरेगाव पार्क व विमाननगर परिसरात सोन साखळी हिसकावल्याचे समोर आले. चोरलेले सोने त्यांनी मित्र संजोग व मनोज यांच्याकडे दिले होते. त्यांनाही पोलिसांनी अटककरून त्यांच्याकडून चोरीचे सोने जप्त केले आहे.