संग्रहित फोटो
पुणे : उच्चभ्रु म्हणून मानल्या जाणाऱ्या खराडीतील सिल्व्हर सोल स्पा ब्युटी अॅण्ड वेलनेस या स्पा सेंटरमध्ये सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर पोलिसांनी छापा कारवाई केली आहे. येथून थायलंड देशातील तीन तरुणीसह सहा जणींची सुटका केली आहे. तर, स्पा सेंटरच्या मॅनेजरला अटक करुन कारवाई केली आहे. मॅनेजर लेनखौके किपगेन (वय. ३० ,रा. मणिपूर) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
दरम्यान याप्रकरणी किपगेन याच्यासह स्पा मालक विकास किशोर ढाले (३०, रा. अमरावती) याच्यावर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायद्यानुसार खराडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत महिला पोलीस कर्मचारी पुजा हडाळे यांनी तक्रार दिली आहे. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक संजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राहुल कोळपे व त्यांच्या पथकाने केली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, खराडी – मुंढवा रस्त्यावर स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांना मिळाली होती. त्यानुसार बनावट ग्राहक पाठवून खात्री करण्यात आली. तेव्हा वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे समोर आले. नंतर पथकाने गुरुवारी सायंकाळी छापा टाकला. त्यावेळी आरोपी पिडीत तरुणींना पैशाचे आमिष दाखवून वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्त करून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेत असल्याचे समोर आले. त्यानुसार पोलिसांनी स्पा मॅनेजरला अटक केली. येथून सहा पिडीत तरुणींची सुटका करून त्यांची रवानगी सुधारगृहात करण्यात आली आहे. यात थायलंड देशातील तीन तरुणींचा समावेश आहे.