संग्रहित फोटो
पुणे : कोथरूड परिसरात एका निरपराध तरुणाला झालेल्या मारहाण प्रकरणात पुणे पोलिसांनी तीन दिवसांनी कडक भूमिका घेत कुविख्यात गुंड गजानन मारणे, रूपेश मारणे यांच्यासह ६ जणांवर मोक्का कारवाई केल्याची माहिती देण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी घटनेची गंभीर दखल घेत गजा मारणेसह त्याच्या साथीदारांच्या मालमत्ता तसेच तो वापरत असलेल्या वाहनांची देखील माहिती घेतली जात आहे. त्यानूसार, पुढील कारवाई केली जाईल, असे आयुक्त अमितेशकुमार यांनी सांगितले. त्यातगैर काही आढळल्यास ते सर्व मोडीत काढले जाणार असल्याचे म्हंटले आहे.
पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने सोमवारी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याशी वार्तालापाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात कोथरूडमध्ये घडलेल्या आयटी इंजिनिअर देवेंद्र जोग मारहाण प्रकरणात पोलिसांनी सुरूवातीला किरकोळ गुन्हा नोंदवला, असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी कोथरूडमधील मारणे टोळीची दहशत मोडीत काढली जाईल. त्यादृष्टीने कारवाई सुरू असून, याप्रकरणात मोक्का कारवाईचे आदेश दिले आहेत.
यामध्ये टोळीप्रमुख गजानन मारणे, रूपेश मारणे, श्रीकांत ऊर्फ बाब्या संभाजी पवार (गजा मारणेचा भाच्चा) तसेच अटक केलेले गुंड ओम तीर्थराम धर्मजिज्ञासू (वय ३५), किरण कोंडिबा पडवळ (वय ३१) अमोल विनायक तापकीर (वय ३५, रा. शास्त्रीनगर, कोथरूड) यांचा समावेश आहे. त्यांच्याबरोबर असलेला साथीदार श्रीकांत ऊर्फ बाब्या संभाजी पवार पसार झाला आहे.
गजानन मारणे स्वत: हजर..!
जोगप्रकरण राजकीय तसेच पुण्यातील सर्व सामान्यांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चेत आल्यानंतर पोलिसांनी कडक भूमिका घेतली, असा आरोप केला जात आहे. परंतु, आयुक्तांनी हा आरोप फेटाळत मोक्का सारख्या कारवाईला कालावधी लागतो, असे सांगत या मारहाण प्रकरणात टोळीप्रमुख गजा मारणेसह तब्बल २७ जणांकडे चौकशी केली जाणार आहे. गजा मारणेच्या घराची झडती घेतली असून, गुन्हे शाखेने ७४ ठिकाणी तपासणी केली. त्या सर्वांचे मोबाईलमधील तांत्रिक विश्लेषण देखी करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी सांगितले. सायंकाळी गजानन मारणे स्वत: कोथरूड पोलिसांत हजर झाला.
गुंडाविरोधात तक्रार करा…
कोथरूडमधील गजा मारणे टोळीवर सुरू असलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांनी पुणेकर नागरिकांना तक्रार करण्याचे आवाहन केले. कोणी दहशत करत असेल किंवा कोणत्या टोळीविरूद्ध तुमची तक्रार असेल तर ती गुन्हे शाखेकडे करा. त्यासाठी स्वतंत्र ‘कक्ष’ सुरू केला असून, शहरातील गुंडाची दहशत मोडीत काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे नागरिकांना तक्रार करावी. तक्रार करणाऱ्यांचे नाव गोपनीय ठेवले जाईल.
गुंडांनी मुख्य प्रवाहात यावे. चांगली वर्तणूक ठेवल्यास त्यांच्यावर कारवाईचा प्रश्नच येणार नाही. मात्र, जे शहरातील कायदा-सुव्यवस्थेला गालबोट लावत आहेत. अशा गुंडांवर पोलीस कठोर कारवाई करतील.
– अमितेश कुमार, पोलीस आयुक्त