पुणे : येरवडा कारागृहातून सांगली कारागृहात घेऊन जाताना कुख्यात गुंड गजा मारणेसोबत धाब्यावर पार्टी करणाऱ्या त्या साथीदाराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या साथीदारांनी त्याचा पुण्यातूनच पाठलाग सुरू केला होता. त्याच्याकडून चार महागड्या कार पोलिसांनी जप्त केल्या आहेत.
गजा मारणे याची सातारा परिसरातील ढाब्यावर झालेल्या मटण पार्टी प्रकरणात मारणेचा सांगलीतील साथीदार बाळकृष्ण उर्फ पांड्या मोहिते याला पोलिसांनी नुकतीच अटक केली. दरम्यान, याप्रकरणात पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी एका सहायक निरीक्षकासह चार पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश दिले.
कोथरुडमधील तरुणाला बेदम मारहाणप्रकरणात मारणेसह सहा जणांवर पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई केली. या प्रकरणात यापूर्वी मारणेच्या दोन महागड्या कार जप्त केल्या होत्या. येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेल्या मारणेला सांगली कारागृहात हलविण्यात येत होते. तेव्हा व्हॅन सातारा रोडवरील एका ढाब्यावर थांबली. पोलीस व्हॅन थांबल्यानंतर मारणेचे साथीदार तेथे आले. त्यांनी गजा मारणेसोबत व्हॅनमध्ये मटण पार्टी केली. बंदोबस्तावरील सहायक निरीक्षकासह पोलीस कर्मचाऱ्यांनी ढाब्यावर जेवण केले. याचे बील मारणेच्या साथीदारांनी दिले होते. याप्रकाराची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना मिळाल्यानंतर त्यांनी पोलिसांचे निलंबन केले.
मारणेला पार्टी देणारे, तसेच त्याला भेटायला आलेल्या साथीदारांवर गुन्हा नोंदवला. नंतर फरार झालेल्या पांडुरंग उर्फ पांड्या मोहिते याला गुन्हे शाखेने सांगलीतून नुकतीच अटक केली. पोलीस व्हॅनचा पाठलाग करताना काही गाड्या सीसीटीव्हीत कैद झालेल्या आहेत. याप्रकरणात आता महागड्या चार कार जप्त करण्यात आल्या आहेत. दरम्यान, मोहिते हा सांगलीतील मारणेचा राईट हँड असून, तो मारणेची टोळी याठिकाणी चालवित असल्याचे पोलिसांनी सांगितले.