संग्रहित फोटो
पुणे : राज्यासह देशभरात फसवणुकीच्या घटना वाढल्या आहेत. दररोज वेगवेगळ्या भागातून लाखो रुपयांच्या फसवणुकीचे प्रकार उघडकीस येत असतात. पोलिसही फसवणुकीच्या घटनांना आळा घलण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अशातचं आता पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने एक मोठी कारवाई केली आहे. बनावट सोने खरे असल्याचे भासवून ते सराफ व्यवसायिकांना देऊन त्यांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या टोळीचा पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे.
याप्रकरणी तिघांना अटक केली आहे, त्यांच्याकडून काळेपडळ, चंदनगर, पर्वती आणि आंबेगाव अशा चार पोलिस ठाण्यातील गुन्ह्यांचा छडा लागला आहे. तर तीन लाख रुपयांची रोकड, एक लाख रुपय किंमतीचे मोबाईल चार लाख रुपये किंमतीचे हॉलमार्क असलेले बनावट दागिने असा आठ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. रोहीत संजय गोरे (वय ३०, रा. धनकवडी), अजय दत्तात्रय पवार (वय २८), ओम सुंदर खरात (वय २३, रा.दोघे वडगावबुद्रुक) अशी अटक करण्यात आलेल्यांची नाव आहेत. तर त्यांना बनाट सोन्याचे दागिने पुरविणाऱ्या मुंबईच्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कामगिरी पोलिस उपायुक्त निखील पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक वाहीद पठाण व त्यांच्या पथकाने केली आहे.
गंभीर गुन्ह्यातील पाहिजे आरोपींची माहिती घेत असताना पथक गस्तीवर होते. त्यावेळी त्यांना माहिती मिळाली होती की, सराफ व्यवसायिकांना सोन्याचे बनाट दागिने गहाण ठेवून फसवणूक करण्याऱ्या टोळीचे सदस्य खांदवेनगर वाघोली परिसरात फिरत आहेत. त्यानुसार पथकाने सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी फसवणूक केल्याची कबुली दिली.
रोहीत गोरे हा टोळीचा म्होरक्या असून, तिघे मुंबई येथील दोघांकडून बनावट सोन्याचे दागिने आणत होते. परंतू हे दागिने शंभर टक्के बनावट नसत. काही प्रमाणात सोन्याचा मुलामा दिलेला असे. तर त्याला ट्रेडमार्क आणि हॉलमार्क देखील असे. त्यामुळे सराफ व्यवसायिकाला विश्वास बसत होता. आपल्याकडील दागिने गहाण ठेवून पैसे घेत होते. परंतू जेव्हा सराफ व्यवसायिक त्याचा टंच काढून मोड करत तेव्हा त्यांना ते बनाट असल्याचे लक्षात येत होते.
टोळीच्या मनसुब्यावर पाणी
सराफ व्यवसायिकांना हे दागिने बनावट असल्याचे समजले तरी, ते पोलिसात तक्रार करणार नाहीत, अशी अटकळ या टोळीने बांधली होती. त्यामुळे टोळी बिनधास्त होती. पण, फसवणूक झाल्याचे निदर्शनास येताच एका सराफ व्यवसायिकाने पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांना बनावट दागिन्यांवर ट्रेडमार्क आणि हॉलमार्क आढळून आल्याने मुंबईच्या दोघांना आरोपी करण्यात आले आहे.