सौजन्य - नवराष्ट्र टीम
पुणे/अक्षय फाटक : सायबर गुन्ह्यांत प्रचंड वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर तसेच सायबर गुन्हेगारांना पकडण्याचे आव्हान लक्षात घेऊन नवी मुंबईतील धर्तीवर पुण्यातही सायबर लॅब सुरू केले जाणार आहे. त्यादृष्टीने प्रयत्न सुरू केले असून, गृहविभागाकडे याबाबतचा प्रस्ताव पाठविण्याची तयारी केली असल्याचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी सांगितले.
पुणे शहरातील वार्षिक गुन्ह्यांची आकडेवारी नुकतीच जाहीर करण्यात आली. तेव्हा गंभीर गुन्ह्यात घट झाली असली तरी सायबर गुन्ह्यात मात्र प्रचंड वाढ झाल्याचे दिसून येत आहे. गेल्या वर्षात जवळपास ३६ हजारहून अधिक तक्रारी पोलिसांकडे प्राप्त झालेल्या आहेत. त्यातून पुणेकरांची जवळपास साडे सहाशे कोटींची फसवणूक झाली आहे. दरवर्षी सायबर गुन्ह्यांमध्ये प्रचंड तक्रारी वाढत असल्याचे दिसत आहे. परंतु, त्याप्रमाणात गुन्हे उघडकीस येत नसल्याचे दिसते.
दरम्यान, सायबर पोलिसांत असलेले कमी मनुष्यबळ, अत्याधुनिक साधणे तसेच कुशल मनुष्यबळाची चणचण यामुळे गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे पुण्यातही सायबर लॅब सुरू करण्याचा विचार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शहरातील वाढते सायबर गुन्हे व पोलिसांकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजनांची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. सायबर गुन्हे रोखण्यासाठी देशपातळीवरील तपास यंत्रणा प्रयत्न करत आहेत. सायबर गुन्ह्यांत पोलिसांकडून वेळोवेळी सूचना देण्यात आल्या आहेत. चोरट्यांचा आमिषांना बळी पडू नका, असे आवाहन करण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.
मुंबईसह परिसरातील सायबर गुन्ह्याच्या तपासासाठी नवी मुंबईत सायबर लॅब सुरू केली आहे. नवी मुंबईप्रमाणे पुण्यातही सायबर लॅब सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू असून, त्याबाबत गृहविभागाकडे प्रस्ताव पाठविण्याचे काम सुरू आहे. सायबर पोलीस ठाणे निर्मिती करण्याबाबतही चाचपणी सुरू आहे. सध्या शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात सायबर पोलीस ठाणे कार्यरत आहे, परंतु, आणखीही सायबर पोलीस ठाण्यांची गरज आहे, असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी नमूद केले.