रत्नागिरी: मुंबई गोवा महामार्गावर LPG गॅस वाहून नेणारा टँकरचा अपघात झाल्याचे समोर आले आहे. हा टँकर पुलावरून खाली कोसळल्याने गॅस टँकरमधून लीक झाला. ही घटना काल रात्रीच्या सुमारास हातखंबा येथे घडली. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसीच्या रेस्क्यू टीमने गॅस गळती तात्पुरती थांबविली आहे. सोबतच त्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना प्रशासनाने सुरक्षित स्थळी हलवले आहे. मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक ठप्प असल्याचे देखील समोर आले आहे. या कारणाने प्रवाशांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
पुढे आलेल्या माहितीनुसार, अद्याप मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक ठप्प असल्याने सध्या ती सुरळीत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हा महामार्ग सात तासांपासून वाहतुकीसाठी ठप्प आहे. पलटी झालेला टँकर सरळ करण्याचे प्रयत्न सुरु आहे. टँकर सरळ झाल्यानंतर गॅस दुसरा टँकरमध्ये ट्रान्सफर केला जाणार आहे. तर हातखंबा गावातील वाणी पेठ या परिसरातील किमान 100 नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिस अधीक्षकांनी या परिसराची पाहणी केलीय. मात्र जोपर्यंत परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात येत नाही आणि टँकर बाजूला करून रस्ता सुरक्षित होत नाही, तोपर्यंत वाहतूक पूर्ववत होणार नाही, असेही आता बोलले जात आहे.
बारामतीमध्ये भीषण अपघात! डंपर खाली दुचाकी आल्याने तीन जणांचा मृत्यू
बारामतीमधील महात्मा फुले चौकात भीषण अपघात झाल्याचे समोर आले आहे. हा अपघात डंपर आणि दुचाकीच्या मधात झाला. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. वडील आणि त्यांच्या दोन मुली यांच्या मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी डंपरच्या चाकाखाली दुचाकी सापडली आणि तिघेही चेंगरले गेले. ही घटना 27 जुलै रोजी घडली आहे.
या अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तींचे नावे वडील ओंकार आचार्य व त्यांच्या दोन मुलींचे नावे चार वर्षाची मधुरा आणि दहा वर्षाची सई आचार्य असे आहे. ओंकार आचार्य हे मूळचे इंदापूर तालुक्यातील सणसर येथील रहिवासी असून सध्या बारामतीतील मोरगाव रोड येथे ते वास्तव्यास होते. हा अपघात इतका भीषण होता की, दुचाकी चालक ओंकार आचार्य यांचं पोटापासून खाली काहीच शिल्लक उरलं नव्हतं. आपल्या मुलीना रस्त्यावर पडलेलं पाहून हळहळलेल्या वडील ओंकार यांनी आपल्या दोन हातांवर जोर देत उठण्याचा प्रयत्न करत होते. माझ्या मुलींना तेवढं वाचवा असं म्हणत होते.