नवी मुंबई: सोशल मीडियावर रील्स स्टारची काही कमी नाही. याच सोशल मीडियावर आता स्टार होण्यासाठी केलेला स्टंट दोघांच्या चांगलंच अंगाशी आलं आहे. व्हिवर्स वाढवण्याच्या नादात जीव धोक्य़ात घालण्याऱ्या स्टंटबाजांना तुर्भे पोलीसांनी चांगलाच धडा शिकवला आहे. ठाणे बेलापूर रोडवरील कोपरखैरणे एमआयडीसी परिसरातील अग्निशमन दलाच्या समोरच्या रस्त्यावर एक इसम रिक्षावर बसून स्टंट करत असतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. याबाबत तुर्भे पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल करून रिक्षा जप्त केली आहे.
नवी मुंबईतील तुर्भे एमआयडीसी पोलिस ठाण्यात एका रिक्षाचालक आणि त्याच्या मित्राविरुद्ध स्वतःचा व इतरांचा जीव धोक्यात घालल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणे बेलापूर मार्गावर समशुद अहमद, वय 27 वर्षे, हा तरुण रिक्शाच्या टपावर बसून चालू रिक्षात स्टंट करत होता. त्याच्या स्टंटचे चित्रीकरण त्याचा मित्र अक्षय धोत्रे हा करत होता. व्हिडिओ शूट केल्यानंतर तो व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला.
हा व्हिडिओ पोलिसांपर्यंत पोहोचल्यावर पोलिसांनी दोघांवर गुन्हे दाखल केले व रिक्षा ताब्यात घेतली. व पोलिसांनी त्यांना माफी मागण्यास सांगितले. आरोपीने माफी मागताना असे म्हटले आहे, की आपण चूक केली आहे. आणि आता भविष्यात असे काहीही करणार नाही. आपल्याला पाहून इतर लोकांनी असे करू नये. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीने तो व्हिडिओ सोशल मीडियावरून काढून टाकला आहे. त्यामुळे असे स्टंट करुन कोणीही जीव धोक्यात घालण्याचा मूर्खपणा करु नये असं नवी मुंबई पोलीसांनी आवाहन केलं आहे.