नेरुळ मधील मंजुळा बिल्डिंग परिसरातील नागरिकांना पाच दिवसांपासून पाणीपुरवठा नाही
सावन वैश्य-
नेरुळ येथील मंजुळा बिल्डिंग परिसरात गेल्या पाच दिवसांपासून भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. सायंकाळी पाणीपुरवठा होत नसल्याने परिसरातील नागरिकांचे हाल होत असल्याचे पाहायला मिळत आहेत. वारंवार तक्रारी करूनही महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने कोणतीही ठोस कारवाई न केल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
दिवाळी सारखा सण तोंडावर आला असतानाच नेरुळ सेक्टर 23 प्लॉट नो अ 77 मधील मंजुळा वसाहतीत पाण्याची बोंबाबोंब सुरु आहे. गेल्या 5 दिवसांपासून येथील नागरिक पाण्याच्या तुटवड्याचा सामना करत आहेत. या इमारतीतील संध्यकाळी होणाऱ्या पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत नसल्याने येथील नागरिकांमध्ये प्रशासनाविरोधात आक्रोश आहे. येथील स्थानिक नागरिकांनानी पाणीपुरवठा विभागाकडे या पिण्याच्या पाण्याबाबत अनेक तक्रारी केल्या. मात्र पालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांना या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
जीवन जगताना पाणी हा अविभाज्य घटक आहे. हाच अविभाज्य घटकाचा पुरवठा होत नसल्याने येथील नागरिकांना पिण्यासाठी, स्वयंपाकासाठी आणि दैनंदिन गरजांसाठी बाहेरून पाण्याचे टँकर्स मागवावे लागत आहे. महिला आणि लहान मुलांचे हाल होत असून, दूषित पाणी पिण्याची भीतीही नागरिकांमध्ये निर्माण आहे. अशातच दिवाळी सारखा सण तोंडावर आल्याने घरी पाहुणे आल्यावर त्यांचा पाहुणचार कसा करावा असा प्रश्न या नागरिकांसमोर उपस्थित होत आहे. तसेच या परिसरातील नागरिकांनी प्रशासनाला तातडीने लक्ष घालून पाणीपुरवठा सुरळीत करावा अशी मागणी केली आहे. जर त्वरित उपाययोजना न झाल्यास ऐन सणासुदीच्या दिवसांत आंदोलनाचा इशाराही नागरिकांनी दिला आहे. त्यामुळे आता या परिस्थितीत प्रशासन काय भुमिका घेणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
अलीकडेच नवी मुंबईतील पाम बीच मार्गावर भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली होती. दोन दुचाकींचा अपघात झाला असून या घटनेत चार जण जखमी झाले होते. यातील दोघे गंभीर जखमी झाल्याचं देखील सांगण्यात आलं होतं. बेलापूरच्या दिशेने जात असलेल्या दुचाकीस्वाराचा गाडीवरील ताबा सुटला आणि त्याची दुचाकी दुभाजकावर जाऊन आदळली. तर याचवेळी मागून येणारी स्कूटी याच दुचाकीवर आदळली. त्यामुळे या घटनेत चौघेजण जखमी झाले. वाशी ते सीबीडी बेलापूर या मार्गिकेवर ही घटना घडल्याची माहिती आहे. अपघाताची माहिती मिळताच नेरुळ पोलीस ठाण्याचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सर्व जखमींना तातडीने रुग्णालया उपचारासाठी दाखल केले.