सौजन्य - नवराष्ट्र टीम
पुणे/अक्षय फाटक : शिवसेनेतील (शिंदे गट) वजनदार नेते असलेल्या तानाजी सावंत यांच्या ‘लाडल्या’च्या अपहरणनाट्याने पुर्ण महाराष्ट्राची जनता ६ तास भूक-तान विसरून त्याच्या सुखरूपतेसाठी प्राथना करत असावी, अशीच काहीशी स्थिती निर्माण झाल्याच्या अर्विभावात माजी मंत्रीमहोदय, पुणे पोलीस अन् इतर यंत्रणांनी युद्धपातळीवर शोधकार्य राबवत उड्डाण घेतलेले विमान कुठेही लँडिंग न करता पुन्हा पुणे धावपट्टीवरच उतरविले.
६ तास चाललेल्या या विशेष अपहरणनाट्यात अपहरण, बेपत्ता अन् कौटुंबिक वाद अशे अनेक तर्क लावले गेले. पण यातले काहीच सत्य नाही, असे आमदार महोदयांनी स्पष्ट केल्यानंतर प्रश्न उपस्थित झाला तो नेमका मुलगा न सांगता गेला का ? तो परतल्यानंतरही हे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. असे असले तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार कौटुंबिक रूसव्या-फुगव्यातून तो बँकॉकला जाण्याच्या निर्णयापर्यंत पोहचला. तत्पुर्वी या एका हायप्रोफाईल ‘केस’मधून यंत्रणा कोणासाठी किती सतर्कता दाखविते अन् ती ‘साल गड्याप्रमाणे’ कशी राबविली जाऊ शकते याचेही उत्तम उदाहरण महाराष्ट्राला पाहिला मिळाले.
महाराष्ट्राचे माजी आरोग्यमंत्री व धाराशीव जिल्ह्यातील विद्यमान आमदार तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषीराज सावंतांचे नर्हे परिसरातून अज्ञातांनी कारमधून अपहरण झाल्याचा कॉल पुणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला चारच्या सुमारास प्राप्त झाला. ही बाब तानाजी सावंत यांना समजल्यानंतर सावंत कुटूंबियांची पायाखालची जमीन सरकली. त्यांनीही विचारपूस सुरू केली. तोपर्यंत त्यांनाही काहीही माहिती नव्हते. फोन लागत नसल्याने हा प्रकार निदर्शनास आला. त्यांनी महाविद्यालयाकडे विचारपूस केल्यानंतर चालकाने त्यांना मी विमानतळावर सोडल्याचे सांगितले. तेथून धावपळ सुरू केली. चौकशीत तो अन् त्याचे दोन मित्र खासगी विमानाने बँकॉकला जात असल्याचे समोर आले. तेव्हा मात्र, कुटूंबिय घाबरले.
नंतर राजकीय वजनाचा वापर करून अवघ्या अर्ध्या तासात अपहरणाचा गुन्हा नोंदविला. परंतु, हाअट्टाहास केवळ मुलाला पुन्हा परत आणण्यासाठी असल्याचे दिसत आहे. कारण, खासगी विमान, अचानक लॅडिंग करण्यासाठी किंवा बँकॉकमधून पुन्हा आहे तशा (गेलेल्या प्रवाशांसह) परिस्थितीत माघारी पाठविण्यासाठी गुन्हा दाखल असणे महत्वाचे असते. त्यामुळेच विचारमय हा गुन्हा नोंदविण्यात आला. त्यानंतर तानाजी सावंत यांनी पुणे पोलीस आयुक्तालय गाठत मुलाला परत बोलविण्याचा प्रयत्न सुरू केले.
परंतु, एका बड्या नेताकडून यंत्रणेला वेठीस धरून ती राबविली कशी जाऊ शकते, हे दिसून आले. चार ते नऊ या साधारण ६ तासांच्या अपहरणनाट्यात वेगाने घडामोडी घडल्या. पुणे पोलीस, उपमुख्यमंत्री तसेच पुण्याचे खासदार व केंद्रीय नागरी राज्य हवाई उड्डाण मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या मदतीने साडे चारला पुण्यातून उड्डाण केलेले विमान बँकॉकला जाण्यापूर्वीच अर्ध्यावरून पुन्हा माघारी फिरवत साडे आठला ते पुणे विमानतळावर उतरविले.
खासगी विमानाचे भाडे ७८ लाख ५० हजार
ग्लोबल फ्लाईट हॅडलिंग सर्व्हिसेस कंपनीकडून रविवारी खासगी विमान बुक केले होते. त्यासाठी ७८ लाख ५० हजार रुपये दिले गेले होते. ही रक्कम आरटीजीएसने दिली गेली होती. विमानात केवळ ऋषीराज, त्याचे दोन मित्र तसेच महिला पायलटसह तीन पायलट होते.
पोलिसांना म्हणाला बिझनेस ट्रिप
ऋषीराजचे विमान पुण्यात आल्यानंतर पुणे पोलिसांनी त्याच्याकडे विचारपूस केली. त्याचा जबाब नोंदविल्यानंतर त्याने मी बिझनेस ट्रिपसाठी जात होतो. नुकताच दुबईवरून आल्याने मला जाऊ देणार नाही, म्हणून मी कोणाला सांगितले नाही, असे म्हंटले आहे. दरम्यान, पुन्हा त्याच्याकडे विचारपूस केली जाणार असल्याचे समजते.
अन् ऋषीराजचा “पोपट” झाला
ऋषीराज व त्याच्या मित्रांनी साडेचार वाजता टेकऑफ केल्यानंतर हे विमान बँकॉकला लँडिंग होणार होते. परंतु, पोलीस यत्रंणा, नागरी हवाई उड्डाण मंत्री यांनी विमान कंपनी यांच्याशी संपर्क साधून पायलटशी संवाद साधला. त्यांना पुर्ण परिस्थिती सांगत हे विमान ऋषीराज व त्याच्या दोन मित्रांच्या परस्पर पुण्याकडे वळविले आणि पुण्यात बरोबर साडेआठलाच पोहचले देखील. तिघेही आपण बँकॉकला आलो, असे समजून खाली उतरले खरे पण क्षणातच त्यांना पोलीस अन् पुणे एअर पोर्ट आपले स्वागत करीत आहे, असा बोर्ड दिसला. तेव्हा त्यांना आपला मोठा पोपट झाल्याचे लक्षात आले. त्याचवेळी भाऊ गिरीराज त्याठिकाणी उपस्थित होता. नंतर ते पोलिसांच्या गाडीत पोलीस आयुक्तालयात आले.