स्वातंत्र्यदिन, दहिहंडी उत्सवाच्या तयारीला सुरुवात (संग्रहित फोटो)
मंचर : 22 एप्रिलला जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा भारताने बदला घेतला. बुधवारी 7 मेला भारतीय सैन्यदलाने पाकिस्तानात एअर स्ट्राईक केला. भारताने पाकिस्तानमधील दहशतवाद्यांची नऊ तळ उद्ध्वस्त केली. यात 100 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केल्याचं सांगितलं जात आहे. या हल्ल्यानंतर पाकिस्तानने देखील सीमेवर शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं असून अंदाधुंद फायरींग करायला सुरुवात केली आहे. पाकिस्तान कडून भारतावर हल्ले सुरु आहेत. मात्र भारताच्या लष्कराने योग्य प्रत्त्युत्तर दिलेले आहे. त्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील पोलीस पाटलांना पोलीस प्रशासनाच्या वतीने सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती मंचर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांनी दिली.
आंबेगाव तालुक्यातील मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ, पारगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे, घोडेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भालेकर यांनी त्यांच्या पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील पोलीस पाटलांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. कुठलाही अनुचित प्रकार घडल्यास तात्काळ पोलीस ठाण्याला कळवावे असे सांगितले आहे. पुढील काही दिवसात युद्ध अजून भडकू शकते. त्यामुळे देशातील पर्यटन स्थळे, धार्मिक ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
ग्रामीण भागात गावातील सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचा दुवा असलेल्या पोलीस पाटील यांना पोलिसांच्या वतीने मार्गदर्शक सूचना करण्यात आल्या आहेत. आंबेगाव तालुक्यातील पारगाव, मंचर, घोडेगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी यांनी गावोगावच्या पोलीस पाटलांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. गावात वाडी वस्तीवर पेट्रोलिंग करणे, गावात नवीन, संशयित नवीन व्यक्ती आढळल्यास पोलीस ठाण्याला कळवणे, दररोज गावात महत्त्वाच्या ठिकाणी मंदिरे, शाळा, कॉलेज, बँका, पतसंस्था इत्यादीवर लक्ष ठेवण्याच्या सूचना पोलीस पाटलांना देण्यात आल्याचे पोलीस प्रशासनाने सांगितले.