बेकायदेशीरपणे दारूची वाहतूक केल्याप्रकरणी एकास अटक (फोटो- istockphoto)
पिंपरी: बेकायदेशीरपणे दारूची वाहतूक केल्याप्रकरणी सांगवी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. ही कारवाई गुरुवारी (24 एप्रिल) सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास विशाल नगर पिंपळे निलख येथे करण्यात आली. नीलकंठ कोमलनायक राठोड (38, पिंपळे सौदागर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार राहुल मोघे यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल नगर पिंपळे निलख येथे सांगवी पोलिसांना एक दुचाकी संशयितरित्या जात असताना दिसली. पोलिसांनी दुचाकी अडवून तपासणी केली असता दुसाकीवर 9 हजार 570 रुपये किमतीची दारू आढळून आली. आरोपी नीलकंठ हा बेकायदेशीरपणे दारूची वाहतूक करताना आढळून आला.
बनावट शूज विक्री प्रकरणी दुकानदारावर गुन्हा
पुमा से कंपनीच्या नावाचा आणि चिन्हाचा वापर करून बनावट शूज आणि चप्पल विक्री केल्याप्रकरणी पिंपरी मधील एका दुकानदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई गुरुवारी (24 एप्रिल) दुपारी पावणेचार वाजताच्या सुमारास दयाराम अँड सन्स या दुकानात करण्यात आली. नितीन रमेश नथराणी (33, पिंपरी) असे गुन्हा दाखल झालेल्या दुकानदाराचे नाव आहे. याप्रकरणी योगेश दशरथ मोरे (48, कोथरूड) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पुमा से कंपनीत काम करतात. त्यांच्या कंपनीचे स्वामित्व असलेल्या नावाचा आणि चिन्हाचा बनावट शूज आणि चपलांवर वापर करून आरोपीने त्याची विक्री केली. याबाबत माहिती मिळाल्यानंतर मोरे यांनी पिंपरी पोलिसांना माहिती दिली. पिंपरी पोलिसांनी कारवाई करत सात लाख 59 हजार रुपये किमतीच्या शूज आणि चपला जप्त केल्या आहेत.
खातेदाराला अंधारात ठेवत ‘FD’ वर काढले पाच लाखांचे कर्ज
खातेदाराच्या परस्पर त्याच्या एफडी रकमेला मॉर्गेज ठेऊन अज्ञात व्यक्तीने पाच लाख रुपयांचे कर्ज काढले. ही कर्जाची रक्कम खातेदाराच्या खात्यातून परस्पर इतर खात्यावर ट्रान्सफर करत पाच लाख रुपयांची फसवणूक केली. ही घटना ५ जुलै २०२४ रोजी पूर्णानगर, चिखली येथे घडली. मात्र हा प्रकार एप्रिल २०२५ मध्ये उघडकीस आला आहे.
Crime News: खातेदाराला अंधारात ठेवत ‘FD’ वर काढले पाच लाखांचे कर्ज; अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल
या प्रकरणी पीडित व्यक्तीने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेच्या एमआयडीसी चिंचवड शाखेत काही रक्कमेची एफडी केली आहे. ती रक्कम मॉर्गेज ठेऊन अज्ञात व्यक्तीने फिर्यादी यांच्या नावावर त्यांच्या परस्पर पाच लाख रुपयांचे कर्ज घेतले.