वाल्मीक कराडवर मकोका लागणार (फोटो- सोशल मिडिया)
बीड: बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराड सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. दरम्यान आज कोर्टात सुनावणी पार पडली. सरकारी वकील उज्वल निकम यांचा युक्तिवाद पार पडला. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात अजूनही आरोप निश्चितीसाठी पुरेसे पुरावे असून आरोप निश्चिती करून घ्यावी, असे उज्वल निकम यांनी कोर्टाला सांगितले. दरम्यान वाल्मीक कराडचा दोषमुक्तीचा अर्ज दाखल करण्यात आला आहे.
सरकारी पक्षाने अजून डिजिटल पुरावे सादर झाले नसल्याचे वाल्मीक कराडच्या वकिलांनी सांगितले. यावर आता 17 जून रोजी कोर्टात पूढील सुनावणी होणार आहे. आज कोर्टात जवळपास एक तास सुनावणी पार पडली. आज डिस्चार्ज अर्जावर सुनावणी होणे अपेक्षित होते, त्यावर आज सुनावणी झाली नसल्याचे समजते आहे. आज किरकोळ अर्जावर दोन्ही बाजूनचे म्हणणे ऐकले गेले.
बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराडला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात वाल्मीक कराडचा हात असल्याचा आरोप आहे.वाल्मीक कराडला मकोला लागू होणार की नाही हे 17 जूनच्या सुनावणीत स्पष्ट होण्याची शक्यता आहे. दोन्ही बाजूनचे म्हणणे ऐकून कोर्ट निर्णय देईल.
या खटल्यातून आणि मकोकामधून मला दोषमुक्त करावे असा अर्ज वाल्मीक कराडने कोर्टसमोर केला आहे. यावर 17 तारखेला सुनावणी होणार आहे. केवळ वाल्मीक कराडने दोषमुक्तीचा अर्ज केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे 17 तारखेला होणाऱ्या सुनावणीत कोर्ट कोणता निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
वाल्मिक कराडचा तुरुंगातही राजेशाही थाट काही संपेना
बीडमधील गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. कुख्यात गुंडांचे असणारे राजकीय संबंध आणि पोलिसांकडून कारवाईस होणारी दिरंगाई यामुळे बीडमधील गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहिलेला नाही. संतोष देशमुख हत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवले. या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या वाल्मिक कराडला तुरुंगामध्ये देखील व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जात आहे. स्पेशल चहा, चिकन आणि झोपण्यासाठी चक्क सहा ब्लॅकेट दिल्या जात आहेत. यामुळे पुन्हा एकदा बीड मध्यवर्ती तुरुंग प्रशासनाचा कारभार समोर आला आहे.
बडतर्फ पोलीस अधिकारी रणजीत कासलेला मागील आठवड्यामध्ये जामीन मिळाला होता. जामीनानंतर त्याने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत अनेक गंभीर आरोप केले असून यामुळे बीडमधील प्रशासनावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडला बीडच्या कारागृहात व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचे या व्हिडिओत म्हटले आहे. कराडला जेलमध्ये स्पेशल चहा दिला जात असून जेवणात त्याला चांगल्या तेल लावून चपात्या देखील दिल्या जात आहेत. त्याचबरोबर त्याला जेवणामध्ये चिकन दिले जात आहे. कासले याने केलेल्या आरोपांमुळे वाल्मिक कराड हा खरंच आरोपी म्हणून तुरुंगामध्ये आहे का असा सवाल उपस्थित होत आहे.