सौजन्य - नवराष्ट्र टीम
सासवड : राज्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, राज्यातील वेगवेगळ्या भागातून चोरीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता सासवडमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. सासवडसह पुरंदर तालुक्याच्या ग्रामीण भागात दुचाकी गाड्या चोरीच्या घटनेत वाढ झाली आहे. त्या अनुषंगाने पोलिसांनी तपास सुरु केला असता दोन आरोपींची नावे निष्पन्न झाली. तसेच त्यांच्याकडून ४ लाख ३५ हजार रुपये किमतीच्या तब्बल नऊ दुचाकी जप्त करण्यात सासवड पोलिसांना यश आले आहे.
याप्रकरणी अर्जुन उर्फ गुड्या महादेव शेलार आणि प्रेम उर्फ दत्ता राजु शेलार दोघेही (रा. भिवरी ता. पुरंदर) यांना अटक करण्यात आले असून, आणखी आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. वैष्णव सुखदेव बारवकर( रा. सासवड )यांची दुचाकी ही पालखी तळ सासवड येथून चोरीस गेली होती. तर सतिष तानाजी लेकावळे (रा. मोहरी बुद्रुक ता. भोर जि. पुणे) यांची दुचाकी बैलगाडा शर्यतीच्या दरम्यान पुरंदर तालुक्यातील मठवाडी येथून चोरी गेली होती. या दोघांनीही सासवड पोलीस स्टेशनला याबाबत फिर्याद दिली होती.
याबाबत पोलिसांनी दिलेले सविस्तर वृत्त असे की, सासवड आणि परिसरात दुचाकी गाड्या चोरीस जात असल्याच्या घटनेत वाढ होत असल्याने याबाबत अधिक तपास केला असता, पुरंदर तालुक्यातील भिवरी येथील दोघांनी अनेक गाड्या चोरल्याचे गोपनीय तपासातून समजले. त्यामुळे दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणावरून तब्बल नऊ गाड्या चोरल्याची कबुली दिली आहे. त्याचबरोबर आदित्य चंद्रकांत जाधव, (रा. ब्राम्हणआळी, सासवड) आणि मोहित ऊर्फ डॉन शंकर गायकवाड (रा. नांदेड, सध्या रा. गराडे, ता पुरंदर) या दोघांनीही घाटाच्या खालून पुण्यातुन विविध ठिकाणावरून दुचाकी गाडया चोरल्याचे कबूल केले.
सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे आणि पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक गणेश पाटील, पोलीस हवालदार सुरज नांगरे, जब्बार सय्यद, पोलीस नाईक गणेश पोटे, पोलीस कॉन्स्टेबल तुषार लोंढे यांच्या पथकाने केली आहे. याबाबत पुढील तपास पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक गणेश पोटे हे करीत आहेत.
सासवड पोलिसांच्या डीबी पथकाने चोरीच्या घटनेतील नऊ दुचाकी जप्त केल्या असून, ज्या व्यक्तींच्या दुचाकी गाड्या चोरीस गेलेल्या आहेत त्यांनी सासवड पोलीस स्टेशनशी संपर्क करावा. तसेच गाड्यांचे कागदपत्रे दाखवून ओळख पटवून माहिती द्यावी. तसेच ज्यांच्या गाड्या चोरीस जावूनही तक्रार दिली नसतील तर अशा व्यक्तींनी पोलीस ठाण्यात तक्रार द्यावी, असे आवाहन पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी केले आहे.