अक्षरज्ञान पब्लिक स्कूलमध्ये शालेय विद्यार्थींनी लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे (फोटो - istock)
Crime News : नांदेड : नांदेड शहरामध्ये अत्यंत लाजीरवाणी घटना घडली आहे. एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील शिक्षकाने सात वर्षीय विद्यार्थिनीवर अमानुष अत्याचार करून ही गोष्ट कोणाला सांगू नये यासाठी दबाव आणला. परंतु त्या चिमुरड्या मुलीच्या आईने त्या विद्यार्थिनीला विश्वासात घेऊन विचारल्यानंतर तिने शाळेतील जीके विषयाच्या शिक्षकांनी तिच्यावर केलेला अमानुष अत्याचार कथन केल्यामुळे या प्रकरणाला वाचा फुटली.
इयत्ता दुसरीमध्ये शिक्षण घेणाऱ्या एका इंग्रजी माध्यमातील शाळेमध्ये हा प्रकार घडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ही घटना १९ नोव्हेंबर रोजी घडली असून आरोपी शिक्षकास पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे व हा खटला फास्ट ट्रैक कोर्टात चालवून आरोपीला तात्काळ शिक्षा देण्यासाठी पोलीस प्रयत्न करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर पैंजणे यांनी पोलीस तपासाबाबत अधिक माहिती देताना सांगितले की आरोपीला ताब्यात घेतले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पूर्णा रोड माधवनगर येथील अक्षरज्ञान पब्लिक स्कूल ही खाजगी विनाअनुदानित इंग्रजी माध्यमाची शाळा असून या शाळेतील शिक्षकाने इयत्ता दुसरी मध्ये शिकणाऱ्या मुलीवर अत्याचार केला. त्यामुळे ही मुलगी घाबरली व तिने दुसऱ्या दिवशी शाळेत जाणार नसल्याचे सांगितल्यावर आईने तिला विश्वासात घेऊन शाळेत काय घडले आहे याची विचारणा केल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या शाळेला असणाऱ्या छोट्या मैदानाच्या सर्व बाजूंना सीसीटीव्ही बसवलेले नसल्यामुळे नेमकी घटना कोठे घडली याबाबत प्रश्नचिन्ह आहे.
इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील प्रकार
शहरातील अनेक इंग्रजी माध्यमांच्या शाळा छोट्या इमारतीमध्ये कोणतीही पायाभूत सुविधा न देता अनेक वर्षापासून शिक्षण विभागाच्या आशीर्वादाखाली चालू आहेत. या शाळांमध्ये भरमसाठ शैक्षणिक शुल्क आकारले जाते. गोरगरीब पालकांची मुले अशा शाळांमधून शिकत असल्यामुळे पालकांनी तक्रार केली तरी ती गृहीत धरली जात नाही.
भाग्यनगर पोलीस स्टेशन अंतर्गत विविध कलमान्वये पोक्सो कायद्यातर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील शैक्षणिक संस्थामध्ये विद्यार्थिनी असुरक्षित असल्याची जाणीव या घटनेमुळे झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये संस्थाचालक पुरुष शिक्षकांना शाळेत नियुक्त्ती देताना कोणतीही खातरजमा न करता किंवा त्यांचे चारित्र्य न तपासता कमी मानधनावर शिक्षक नेमत असल्यामुळे अशा घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे शिक्षणक्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
अमानवीय आणि लाजीरवाणे कृत्य
अनेक शाळांमध्ये लिंगपिसाट शिक्षक चिमुरड्या मुलींना आपले लक्ष्य बनवतात. त्यांच्या आयुष्याशी खेळण्याचा प्रकार करतात. त्यामुळे या चिमुरड्या मुलीचे भावविश्व संपूर्णपणे उध्वस्त झाले आहे. अशा नराधमास जास्तीत जास्त शिक्षा व्हावी व कायद्याचा धाक निर्माण व्हावा यामुळे पुढे भविष्यात शाळेतील शिक्षक असे अमानवीय कृत्य करणार नाहीत अशी मागणी पालकांमधून होत आहे.






