अमरावती शहरात कर्तव्यावर असलेल्या सहायक पोलीस उपनिरीक्षक (ASI) अब्दुल कलाम यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या खळबळजनक प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या युनिट 2 ने तात्काळ कारवाई करत तीन आरोपींना अटक केली आहे. आरोपींची नाव फाजील खान साबीर खान, जियान उद्दीन ऐसान उद्दीन (वय 22) आणि आवेज खान अयुब खान (वय 22) असे आहे.
Indapur Crime : इंदापुरात तरुणाची आत्महत्या; धक्कादायक कारणही आलं समोर
हत्या कशी घडली?
ASI अब्दुल कलाम हे आपल्या टू व्हिलरवरून जात असताना त्यांना फोर व्हिलरने जोरात धडक दिली गेली. अपघातानंतर हल्लेखोरांनी त्यांच्या पोटावर व छातीवर धारदार शस्त्राने सपासप वार केले. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले व त्यांना तातडीने बेस्ट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. या हत्येचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, आरोपींकडून चौकशी केली जात आहे.
फाजील खानला जखमी अवस्थेत अटक
मुख्य आरोपी फाजील खान याला पोलिसांनी ख्वाजानगर भागातून जखमी अवस्थेत ताब्यात घेतले आहे. त्याचा डावा पाय अपघातात फ्रॅक्चर झाला असून, सध्या त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेनंतर पोलिस आयुक्त अरविंद चावरिया यांनी घटनास्थळी भेट देत तपास पथकांना तात्काळ मार्गदर्शन केलं. स्थानिक गुन्हे शाखेच्या युनिट 2 ने तपासाची सूत्रे हाती घेत, अवघ्या २४ तासांत तिन्ही आरोपींना अटक केली.
शहरात एका पोलीस अधिकाऱ्याची अशी उघडपणे हत्या झाल्यानं सामान्य नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. कायदा-सुव्यवस्थेवर नागरिकांचा विश्वास अबाधित राहावा यासाठी प्रशासनाकडून कठोर पावले उचलली जातील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.