कात्रजमध्ये जोडप्याला मारहाण (फोटो- istockphoto)
पुणे: गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले पाहायला मिळत आहे. कोयत्याने हल्ला करणे, लूटमार, सायबर क्राईम अशा प्रकारचे गुन्हे वाढताना दिसून येत आहेत. मात्र गुन्हेगारीचे प्रमाण कमी करण्यासाठी पुणे पोलीस देखील मोठ्या प्रमाणात अवशेक पावले उचलताना दिसत आहेत. मात्र वादविवाद, जुनी भांडणे यातून एकमेकांवर हल्ला करण्याचे प्रमाण वाढताना दिसून येत आहे. मात्र कात्रज परिसरामध्ये एक वेगळाच गुन्हा समोर आला आहे. एका टोळक्याने जोडप्याला विनाकारण मारहाण केल्याची घटना घडली आहे. हे प्रकरण नेमके काय आहे, ते जाणून घेउयात.
कात्रज परिसरात सात ते आठ जणांच्या टोळक्याने कोणतेही कारण नसताना दांपत्याला बेदम मारहाण केल्याची घटना घडली. संतोष नगर परिसरात हा प्रकार घडला असून, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आंबेगाव पोलीस ठाण्यात संतोष नगर येथील तिरुपती कॉलनी येथे राहणाऱ्या ४० वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. त्यावरून सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, ही घटना रात्री साडेदहाच्या सुमारास आदर्श कॉलनी येथे रस्त्यावर घडली. तक्रारदार व त्यांची पत्नी या परिसरातून जात होते. तेव्हा सुरुवातीला दोघांनी तक्रारदाराला शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. नंतर आणखी पाच जण तिथे आले, त्यांनीही तक्रारदाराला मारहाण केली. आरोपीने लोखंडी फायटरने तक्रारदाराच्या डोक्यात आणि तोंडावर ठोसा मारून जखमी केले. यादरम्यान तक्रारदाराची पत्नी त्यांच्या मदतीसाठी धावून आली असता, दोन आरोपींनी त्यांना देखील मारहाण केली. या घटनेनंतर आंबेगाव पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. मारहाणीचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस तपास करीत आहेत.
हेही वाचा: मोड आलेले हरभरे खाल्याने पत्नीला राग अनावर; करंगळीचा चावा घेतला अन् मिक्सरच्या भांड्याने…
घरात भिजवलेले (मोड आलेले) हरभरे खाल्याने पत्नीने पतीला लाटण्याने व मिक्सरच्या भांड्याने मारहाण करत त्याच्या करंगळीचा चावा घेऊन नख तोडल्याचा धक्कादायक प्रकार सोमवार पेठेत घडला. या प्रकरणी सोमवार पेठेतील त्रिशुंड गणपती मंदिराजवळ राहणाऱ्या ४४ वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. त्यावरून समर्थ पोलीस ठाण्यात त्याच्या ४० वर्षीय पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना एक डिसेंबरला रात्री साडेनऊच्या सुमारास घडली.
पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदाराने घरात मोड आलेले हरभरे ठेवले होते. पतीने ते खाल्ले. यावरून पती-पत्नीमध्ये वाद झाले. वादानंतर पत्नीने पतीला शिवीगाळ केली. त्याला लाटण्याने मारहाण केली. पत्नीने लाटण्याने तळ हातावर, डोक्यात, पाठीवर मारले. तसेच, हाताच्या नखांनी तोंडावर, गालावर, डाव्या कानाच्या पाठीमागे पोटाला ओरखडले. त्यावेळी तक्रारदाराने पत्नीच्या हातातील लाटणे हिसकावून घेतले. त्यामुळे चिडलेल्या पत्नीने मिक्सरचे भांडे घेऊन दोन वेळा तक्रारदाराच्या डोक्यात मारले. नंतर पत्नीने तक्रारदाराची पँन्ट खाली ओढली. यामुळे तक्रारदार खाली बसले. पत्नी मारहाण करीत असताना स्व रक्षणासाठी तक्रारदाराने दोन्ही हात वर करून डोके झाकण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तक्रारदाराच्या पत्नीने हाताच्या करंगळीला चावून नख तोडले. घटनेनंतर घाबरलेल्या पतीने पोलिसांत धाव घेऊन तक्रार दिली. पुढील तपास पोलीस करत आहेत.