सौजन्य - नवराष्ट्र टीम
पुणे : गेल्या काही दिवसाखाली पुण्यातील एका बेकरीत खरेदी केलेल्या क्रिमरोलमध्ये ‘विमल’ची पुडी सापडल्याने खळबळ उडाली होती. अशातचं आता पुण्यातून आणखी एक संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. लष्कर परिसरातील एका हॉटेलात जेवण्यासाठी गेलेल्या कुटूंबाला देण्यात आलेल्या सूपमध्ये झुरळ आढळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी लष्कर पोलिसांकडून संबंधित हॉटेलचे मालक, तसेच व्यवस्थापकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अश्विनी रवी शिरसाठ (वय ३१, रा. दापोडी, मुंबई-पुणे रस्ता) यांनी लष्कर पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, भिवंडी दरबार हॉटेलचे व्यवस्थापक अमन हुसेन शेख (वय २४, रा. आझादनगर, भिवंडी) याच्यासह मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, शिरसाठ कुटुंबीय हे गेल्या महिन्यात १६ जून रोजी कॅम्प येथील भिवंडी दरबार हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी गेले होते. त्यंनी जेवण मागविले. जेवण सुरू करण्यापूर्वी त्यांना सूप देण्यात आले. तेव्हा शिरसाट यांना दिलेल्या सूपमध्ये झुरळ आढळले. या घटनेनंतर शिरसाठ यांनी हॉटेल व्यवस्थापकासह कामगारांना जाब विचारला. तेव्हा त्यांनी सारवासारव केली.
हे सुद्धा वाचा : पुण्यात मद्य विक्री दुकानातून चोरी; दारुच्या बाटल्यांचीही तोडफोड
हॉटेल व्यवस्थापकाने भटारखान्यातील स्वच्छतेची कोणतीही दक्षता घेतली नाही, तसेच ग्राहकांच्या आरोग्याला हानी होईल, असे खाद्यपदार्थ दिल्याचे शिरसाठ यांनी तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी भारतीय न्यायसंहिता २७५ अन्वये (ग्राहकांना भेसळयुक्त खाद्यपदार्थ विक्री करणे) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार कुंभार तपास करत आहेत.
याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार आली होती. पोलिसांनी संबंधित हॉटेलमधील सूप अन्न आणि ओैषध प्रशासनाकडे (एफडीए) तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. याबाबतचा अहवाल मिळाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.
– गिरीश दिघावकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लष्कर पोलीस ठाणे
मंदिराच्या प्रसादातही झूरळ आढळला
रेस्टोरंट आणि हॉटेलमध्ये जेवनात मेलेले किडे आणि झूरळ आढळल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. गेल्या काही दिवसाखाली आंध्र प्रदेशातून असाच एक प्रकार उघडकीस आला होता. एका प्रसिद्ध मंदिराच्या प्रसादात मेलेला झूरळ आढळल्याची घटना घडली होती. प्रसाद म्हणून वाडण्यात येणाऱ्या लाडूमध्ये झूरळ आढळला होता. या प्रकारानंतर भाविकांमध्ये संतापाची लाट पसरली. आंध्र प्रदेशच्या श्रीशैलम देवस्थानम मंदिरात भाविकाना प्रसाद म्हणून लाडूचे वाटप केले जातात. याच लाडूमध्ये मेलेला झूरळ आढळल्याची घटना घडली होती.






