संग्रहित फोटो
पुणे : राज्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून राज्यातील वेगवेगळ्या भागातून चोरीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पुण्यातील कल्याणीनगर येथील एका मद्य विक्री दुकानाचे शटर उचकटून चोरट्याने गल्ल्यातील १५ हजारांची रोकड चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तर मद्याच्या बाटल्या फोडून नुकसान केल्याचाही प्रकार घडला आहे. याप्रकरणी सचिन अंगदराव मुसळे (वय ३१, रा. आदर्शनगर ) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार नगर रस्त्यावरील कल्याणीनगर भागात प्रकाश वाईन्स हे मद्य विक्रीचे दुकान आहे. गुरुवारी पहाटे सव्वा पाचच्या सुमारास चोरट्यांनी मद्य विक्री दुकानाचे लोखंडी शटर उचकटून आत प्रवेश केला. त्यानंतर गल्ल्यातील १५ हजारांची रोकड लांबविली, तसेच चोरट्याने दुकानातील मद्याच्या बाटल्या फोडल्या. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेतली. पोलिसांनी मद्य विक्री दुकानाच्या परिसरातील सीसीटीव्ही तपासासाठी ताब्यात घेतले आहेत. सहायक निरीक्षक नंदनवार अधिक तपास करत आहेत.
पुण्यात भरदिवसा घरफोड्या
घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांनी कोंढवा आणि आंबेगाव पठार भागात भरदिवसा ३ फ्लॅट फोडून सुमारे ३ लाख ५६ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली. चोरट्यांनी बंद घरांची टेहळणी करून ही चोरी केल्याचा संशय आहे. दुपारी झालेल्या या घरफोड्यांमुळे पोलिसांची गस्त आणि प्रतिबंधात्मक यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. याप्रकरणी कोंढवा आणि भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून, आरोपींचा तपास सुरू आहे.
घरफोड्यांपुढे पोलीस हतबल!
पुणे शहरातील घरफोड्यांपुढे पुणे पोलिसांची हतबलता लोटांगण घेऊ लागली असून, चोरटे पुढे अन् पोलिस मागे असेच काही चित्र गेल्या काही वर्षांपासून असल्याचे पाहिला मिळत आहे. कोट्यवधी रुपयांवर चोरटे डल्ला मारत असताना पोलिसांचे हात रिकामेच असून, गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण देखील किरकोळ स्वरूपातच आहे. दरम्यान, गेल्या काही महिन्यात या घटना सलग घडत असून, पुन्हा एकाच दिवशी सहा ठिकाणी घरफोडीचे प्रकार घडले आहेत. ज्यात लाखो रुपयांवर डल्ला मारला गेला आहे. त्यामुळे पुणेकर भयभित आहेत.
हे सुद्धा वाचा : पुण्यात तरुणाने उचललं टोकाचं पाऊल, गळफास घेऊन संपवलं आयुष्य; कारण…
वॉशरूमच्या खिडकीतून प्रवेश करुन चोरी
पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. दुसऱ्या मजल्यावरील वॉशरूमच्या खिडकीतून सराफी दुकानात शिरलेल्या चोरट्यांनी पावणे पाच लाखांचा ऐवज चोरून पोबारा केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. चोरट्यांनी रोकड आणि दागिने चोरून नेले आहेत. बाजीराव रोडवरील बुधवार पेठेतील आर. जे. ज्वेलर्स या दुकानात ही घटना घडली आहे. याप्रकरणी रितेश पिचा (वय ४४, रा. मार्केटयार्ड) यांनी विश्रामबाग पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यानूसार, अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






