rickshaw (फोटो सौजन्य- pinterest)
नाशिकमध्ये एक संतापजनक बातमी समोर येत आहे. एका रिक्षा चालकाने भररस्त्यात नग्न होत अश्लील हावभाव करत महिलेचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. संशयित रिक्षाचालक मिजान रजा ऊर्फ मल्ला सादिक शेख याला मुंबई नाका पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी हा सराईत गुन्हेगार असून तो शहरातून तडीपार असल्याची माहिती समोर आली आहे.
नागपूर हादरलं: आयपीएस अधिकाऱ्यावर महिला डॉक्टरने केला बलात्काराचा आरोप
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिटीलिंकची बस बोधले नगर परिसरातून येतांना अचानक बंद पडली. यामुळे बसमधील प्रवासी दुसऱ्या बसची वाट पाहत खाली उतरले. त्यावेळी एक रिक्षाचालक प्रवाशांना घेऊन जाण्यासाठी विचारणा करण्यासाठी आला होता. त्याने एका महिलेला विचारले की, तुमको किधर जाना है, यावेळी महिलेने रिक्षा चालकाला नकार दिला. यानंतर महिला बसची वाट बघत असता संशयिताने तुमको किधर जाना है, असे म्हणत हाताने अश्लील इशारे केले.
रिक्षाचालक कपडे काढून नग्न झाला आणि…
यानंतर महिला घाबरून गेली होती. काही वेळाने सिटीलिंकची बस तेथे आल्याने प्रवासी बसमध्ये बसले. बस द्वारकेच्या दिशेने निघाली असता रिक्षाचालक तिचा पाठलाग करत आहे, असे महिलेला जाणवले. द्वारका सर्कल येथे सिटीलिंक बस आली असता रिक्षाचालक आणि त्याच्या मित्राने रिक्षा बसला आडवी लावली. यानंतर रिक्षाचालकाने कपडे काढून तो नग्न झाला. त्याने सिटीलिंक बस चालक आणि वाहकाला देखील मारहाण केली. तसेच बसवर दगड फेकत बसच्या काचादेखील फोडल्या. यानंतर घाबरलेल्या प्रवाशांनी पोलिसांना फोन केला.
आरोपी तडीपार
काही वेळातच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि संशयित आरोपींना ताब्यात घेतले. संशयित रिक्षाचालक मिजान रजा ऊर्फ मल्ला सादिक शेख हा भद्रकाली, जुने नाशिक या परिसरात राहणारा आहे. यापूर्वी त्याच्यावर एक दरोड्याचा गुन्हा दाखल आहे. 16 ऑगस्ट रोजी दंगलीतील तो आरोपी आहे. त्याला शहरातून तडीपार करण्यात आलेले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच संशयित आरोपीकडे असलेली रिक्षा पोलिसांनी जप्त केली आहे.