तळोजा येथील धक्कादायक घटनेने रायगड हादलले आहे. तळोजा पोलीस हद्दीत येणाऱ्या एका इमारतीत अवघ्या पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. आरोपी 19 वर्षीय एसी रिपेंरिग असून, त्याचे नाव अख्तर हुसेन असे असल्याचे चौकशीत पुढे आले आहे. आरोपी एसी दुरुस्त करण्यासाठी इमारतीत आला होता. काम संपवून निघाला असताना इमारतीच्या पार्किंग परिसरात एक चिमुकली एकटीच खेळत असल्याचे त्याच्या दृष्टीस पडली. तिच्या एकटेपणाचा फायदा घेत आरोपीने तिच्यावर अत्याचार केला. ही घटना सायंकाळी 7 ते 8 वाजणेच्या सुमारास घडली. इमारतीला सुरक्षा रक्षक आहे. मात्र, घटना घडली त्या वेळी तो जागेवर नव्हता. त्यामुळे आरोपीने परिस्थितीचा गैरफायदा घेतल्याचा नागरिकांना संशय आहे.
आरोपीने पीडित चिमुकलीला इमारतीच्या लिफ्टमध्ये नेऊन तिच्यावर कथितरित्या बलात्कार केला. त्यानंतर लिफ्ट तिसऱ्या मजल्यावर नेऊन तिला तिथेच सोडण्यात आले. दरम्यान, पीडिता घरी जाऊन उलट्या करु लागली. सदर प्रकार आईच्या लक्षात आली तेव्हा आईने मुलीकडे विचारणा केली. त्यानंतर पीडितेने घडलेला प्रसंग आईला सांगितला. मुलीने सांगीतलेला प्रकार ऐकून आई-वडील घाबरुन गेले. दरम्यान, घडलेला प्रकार काही मिनिटांपूर्वीचा असल्याने आई-वडील धावत बाहेर आले. याच वेळी मुलीनेही आरोपीला पळून जाताना ओळखले. त्यानंतर मुलीचे वडील, सुरक्षारक्षक आणि इमारतीतील नागरिकांनी आरोपीला पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले.
पोलिसांनी घटनेची गांभीर्याने दखल घेतली. आरोपीविरोधोत बलात्कार आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपीला न्यायालयासमोर हजर केले जाणार असून, पुढील चौकशीसाठी आरोपीची पोलीस कोठडी न्यायालयाकडे मागितली जाणार आहे. डिलिव्हरी बॉय, गॅस शेगडी रिपेअरींग, कुरीअरवाला असे काम करणारे लोक अनोळखी असतात. ते काही वेळासाठीच घरी येतात. त्यामुळे यांच्यापासून खूप सावधानता बाळगावी, असे अवाहनही पोलिसांनी केले.