सौजन्य - नवराष्ट्र टीम
पुणे : सिंहगड रोड पोलिसांनी दुहेरी कारवाईत मोठा शस्त्रसाठा पकडला असून, दोन अल्पवयीन मुलांसह चौघांना पकडले आहे. या चौघांकडून पोलिसांनी तब्बल चार पिस्टल तसेच तीन जिवंत काडतूसे जप्त केले आहेत. धक्कादायक म्हणजे, एका सराईत गुन्हेगार असलेल्या अल्पवयीन मुलाने मध्यप्रदेशातून हे पिस्तूल आणून विक्री केल्याचे समोर आले आहे. त्या गुन्हेगारानेच काही महिन्यांपुर्वी अभिरूची पोलिस चौकीजवळ गोळीबार केला होता.
याप्रकरणी पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांसह अनिकेत महादेव सोनवणे (वय २६, रा. सिद्धार्थनगर, तुळजापूर, जि. धाराशिव) आणि तडीपार गुन्हेगार किरण विठ्ठल शिंदे (वय २३, रा. जे.एस.पीएम. कॉलेजजवळ) यांना पकडले आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक दिलीप दाईंगडे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) उत्तम भजनावळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संतोष भांडवलकर, गणेश झगडे, विनायक मोहिते, राहुल ओलेकर व त्यांच्या पथकाने केली आहे.
वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सिंहगड रोड पोलिस हद्दीत गस्त घालत होते. तेव्हा पथकाला माहिती मिळाली की, वडगाव येथील एका महाविद्यालयाजवळ अल्पवयीन मुलगा थांबला असून, त्याच्याकडे पिस्तूल आहे. यानूसार पथकाने त्याला पकडले. त्याची झडती घेतली त्याच्याकडे पिस्तूल मिळाले. अधिक चौकशीत त्याने सराईत गुन्हेगार असलेल्या दुसऱ्या अल्पवयीन मुलाकडून पिस्तूल घेतल्याची माहिती दिली. त्यानूसार पथकाने त्यालाही पकडले. चौकशीत त्याच्याकडून एक पिस्तूल जप्त केले. तर आणखी एक पिस्तूल अनिकेत सोनवणेला दिल्याची माहिती दिली. नंतर पोलिसांनी अनिकेतला पकडून त्याच्याकडून एक पिस्तूल जप्त केले.
मध्यप्रदेशातून पिस्तूल आणले
सराईत गुन्हेगार असलेल्या अल्पवयीन मुलाने मध्यप्रदेशातील सेंधवा जिल्ह्यातून हे पिस्तूल आणले होते. तीन पिस्तूल त्याने आणले होते. त्यातील एक पिस्तूल या एका अल्पवयीन मुलाला दिले होते. तर दुसरे अनिकेतला दिले होते. यापुर्वीही अल्पवयीन मुलाला गोळीबार प्रकरणात पकडण्यात आले होते. त्याने अभिरूची पोलिस चौकीजवळ गोळीबार केला होता. तर, चंद्रलोक गार्डन परिसरात गोंधळ घातला होता. दरम्यान, अल्पवयीन मुलगा पिस्तूलांची तस्करी करत असल्याचे यावरून दिसत आहे.
तडीपार गुन्हेगारही पिस्तूलासह जाळ्यात
सिंहगड रोड पोलिसांनी अल्पवयीन मुलांसोबतच तडीपार किरण शिंदे यालाही तडीपार आदेशाचा भंग करून पुन्हा शहरात आल्याने पकडले आहे. त्याच्याकडून देखील एक पिस्तूल आणि दोन जिवंत काडतूसे जप्त केली आहेत. त्याच्यावर स्वतंत्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्याने हे पिस्तूल मात्र, दुसऱ्याच व्यक्तीकडून घेतल्याची माहिती आहे. त्याबाबत तपास सुरू आहे.