पत्नी नांदायला येत नाही म्हणून जावयाने थेट सासूवरच केला चाकूने हल्ला (संग्रहित फोटो)
संग्रामपूर : पत्नी नांदायला येत नसल्याचा राग मनात धरून जावयाने चक्क सासूवर चाकूने हल्ला केला. ही घटना बुधवारी (दि.12) रात्री आठच्या सुमारास पातुर्डा येथे घडली. या हल्ल्यात सासू गंभीर जखमी झाली असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान, पोलिसांनी हल्लेखोर जावयास अटक करून न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
पती पत्नीला दारू पिऊन मारहाण करत असल्याने पत्नी आपल्या माहेरी आईकडे पातुर्डा येथे राहण्यास गेली होती. दरम्यान, आरोपी जावई पांडुरंग श्रीकृष्ण अढाव हा 12 मार्च रोजी पत्नीला नेण्यासाठी तिच्या माहेरी गेला. पत्नी नांदायला येत नसल्याचा राग मनात धरून जावयाने चक्क सासूवरच चाकूने प्राणघातक हल्ला केला होता. या हल्ल्यात सासू भागर्ताबाई जगदेव बोबडे (वय 49) गंभीर जखमी झाल्या. त्यांनी आरडाओरड केल्याने त्यांचा मुलगा व शेजाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
नंतर, जखमी अवस्थेत त्यांना अकोला येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या प्रकरणी राजू जगदेव बोबडे यांनी तामगाव पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपी पांडुरंग श्रीकृष्ण अढाऊ (रा. माळेगाव बाजार ता. तेल्हारा जि. अकोला) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
24 तासांत आवळल्या आरोपीच्या मुसक्या
ठाणेदार राजेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनात दुय्यम ठाणेदार जीवन सोनवणे, पोलिस अंमलदार प्रमोद मुळे, संतोष मेंहेगे यांनी तपासचक्र फिरवित अवघ्या 24 तासांत फरार आरोपीच्या मुसक्या आवळल्या. दरम्यान, आरोपीस संग्रामपूर न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. गुन्ह्याचा पुढील तपास तपास दुय्यम ठाणेदार जीवन सोनवणे हे करीत आहेत.