गर्भवतीची चिमुकलीसह विहिरीत उडी (फोटो सौजन्य-X)
गंगाखेड : तालुक्यातील भांबरवाडी येथील सासरच्या घरी होत असलेल्या जाचाला कंटाळून प्रतिभा भांबरे (वय 25) या गर्भवती महिलेने आपल्या दोन वर्षांच्या मुलासह गोदावरी नदीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी (दि.१४) सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. माहेरहून दोन लाख रूपये आणण्यासाठी सासरची मंडळी छळ करत होती, अशी माहितीही आता समोर आली आहे.
पैशांसाठी छळ याला त्रासून आत्महत्या केल्याची फिर्याद गवनाजी व्होरे (रा. वैतागवाडी, ता. सोनपेठ) यानी गंगाखेड पोलिस ठाण्यात दिली. या फिर्यादीवरून सासरच्या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेने तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. वैतागवाडी येथील गवनाजी व्होरे यांनी आपल्या मुलीचे लग्न गजानन भांबरे (रा. भांबरवाडी ता. गंगाखेड) याच्यासोबत करून दिले होते. विवाहिता प्रतिभा भांबरे हिला लग्नानंतर एक वर्ष चांगले नांदवले. त्यानंतर सासरची मंडळी छळ करायला लागली.
प्रतिभा भांबरे हिला त्रास दिला जात होता. सासरची मंडळी पिठाची गिरणी व मोटार सायकलसाठी दोन लाखांची मागणी करत जाचास सुरुवात केली. माहेरच्या लोकांनी पिठाच्या गिरणीसाठी 30 हजार रूपये दिले. हे पैसे दिल्यानंतर मोटारसायकल घेण्यासाठी प्रतिभाला माहेराहून दीड लाख रुपये घेऊन ये म्हणून जाच करू लागले. सासूचे वडील आणि भाऊ यांनी लाऊन दिल्याने तिला त्रास होत होता. शेतात काम करत नाही म्हणून उपाशीपोटी ठेवणे, भांडण करून त्रास देणे, जेवताना ताटाला लाथ मारणे, नवरा गजानन भांबरे हाही चारित्र्यावर संशय घेऊन छळ करत होता.
पाच जणांवर गुन्हा दाखल
या छळाला त्रासून गेलेल्या प्रतिभा भांबरे या गर्भवती मातेने आपल्या माणिक भांबरे या दोन वर्षाच्या मुलाला घेऊन खळी गोदावरी नदी परिसरात उडी घेऊन आत्महत्या केली. माय-लेकाराचा मृतदेह गोदावरी नदीतून बाहेर काढला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी रविवारी शवविच्छेदन केले.
पाच जणांवर गुन्हा दाखल
विवाहितेच्या वडिलानी दिलेल्या फिर्यादीवरून सासरच्या पाच जणांवर गुन्हा दाखल केला. यात नवरा गजानन भांबरे, सासरे संजय भांबरे, सासू सौमित्रा भांबरे (रा. भांबरवाडी ता. गंगाखेड) व सासूचे वडिल विठ्ठल वैतागे, सासूचा भाऊ लक्ष्मण वैतागे (रा. वैतागवाडी, ता. सोनपेठ) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आत्महत्या करण्यापूर्वी ठेवली चिठ्ठी
प्रतिभा भांबरे हिने गोदावरी नदी काठावर सासरच्या मंडळीचा जाच होत असल्याने आत्महत्या करत असून, आरोपीना कठोर शिक्षा व्हावी, असे लिहिले होते. पोलिसांनी गर्भवती मातेने दोन वर्षाच्या मुलासह आत्महत्या केल्याचे प्रकरण गंभीरतेने घेऊन आरोपींना शिक्षा होईल, असा तपास करून चार्जशिट तयार करावे, तपासात कोणत्याही त्रुटी ठेऊ नयेत, अशी मागणी पुढे येत आहे.