मराठवाड्याच्या आरोग्य व्यवस्थेत क्रांती होणार! (Photo Credit- X)
दररोज सुमारे तीन हजार बाह्यरुग्ण उपचारासाठी घाटीत दाखल होतात, तर हजारो रुग्णांवर आंतररुग्ण म्हणून उपचार केले जातात. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांसह जळगाव, बुलडाणा आणि अहिल्यानगरसारख्या जिल्ह्यांतील रुग्णांसाठी घाटी हेच प्रमुख उपचारकेंद्र बनले आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांची संख्या मोठी असल्याने परवडणाऱ्या उपचारांसाठी या रुग्णालयावर मोठा भार असतो. घाटीला एम्सचा दर्जा मिळावा, या मागणीला आता राजकीय पातळीवरही बळ मिळत आहे. विधान परिषदेत आमदार सतीश चव्हाण यांनी हा मुद्दा उपस्थित करून सरकारचे लक्ष वेधले. त्यावर उत्तर देताना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवून पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन दिले. जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनीही घाटीच्या सुविधा वाढविण्यासाठी राज्य स्तरावर प्रयत्न सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे. केंद्र सरकारकडून नवीन एम्स संस्थांसाठी मोठ्या निधीची तरतूद केल्याने मराठवाड्यासाठी ही संधी मानली जाते.
घाटी है केवळ शहरापुरते मर्यादित नाही मराठवाड्यातील लाखो रुग्णांसाठी हे अंतिम आधारस्थान आहे. ग्रामीण भागातील अनेक रुग्णांना मोठ्या शहरांमध्ये उपचार घेणे आर्थिकदृष्ट्या शक्य नसते. घाटी स्वस्त आणि विश्वासार्ह उपचार देणारे केंद्र म्हणून ओळखले जाते. आधुनिक उपकरणांची, तज्ज्ञ डॉक्टरांची आवश्यकता आहे.
घाटीला एम्सचा दर्जा मिळाल्यास केंद्र सरकारकडून मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध होऊ शकतो. त्यामुळे रुग्णालयाचा विस्तार, नवीन इमारती, अत्याधुनिक उपकरणे आणि अधिक खाटांची सुविधा निर्माण होऊ शकते. देशभरातील तज्ज्ञ डॉक्टर आणि संशोधक येथे कार्यरत होण्याची संधी वाढेल. हृदयविकार, कर्करोग, मेंदूविकार यांसारख्या गुंतागुंतीच्या आजारांवरील उच्चस्तरीय उपचार स्थानिक पातळीवर उपलब्ध होतील.
एम्सचा दर्जा मिळाल्यास घाटी केवळ उपचार केंद्र राहणार नाही, तर राष्ट्रीय स्तरावरील वैद्यकीय शिक्षण व संशोधनाचे केंद्र बनू शकते. विद्यार्थ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानासह प्रशिक्षणाची संधी मिळेल. यामुळे मराठवाड्यातील विद्याव्यांना देशातील सर्वोच्च दर्जाच्या वैद्यकीय शिक्षणाची संधी आपल्या भागातच उपलब्ध होऊ शकते. परिणामी घाटीची ओळख राष्ट्रीय पातळीवर अधिक भक्कम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Jayakwadi Dam: मराठवाड्यासाठी गुड न्यूज! जायकवाडीत ८१% पाणीसाठा; उन्हाळ्याची चिंता मिटली?






