टीईटी परीक्षेमध्ये मराठी माध्यमातील शिक्षकांसाठी इंग्रजी भाषा बंधनकारक करण्यावर विचार सुरु आहे (फोटो - istock)
TET Exam : नांदेड : शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) प्रक्रियेत काही शिक्षकांकडून नियमबाह्य पळवाटा शोधल्या जात असल्याचा गंभीर मुद्दा पुढे आला असून मराठी माध्यमातील शिक्षकांसाठी इंग्रजी विषय सक्तीचा करण्याची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात महाराष्ट्र भाषा समितीचे सदस्य प्रशांत बन्सीलाल बंब यांनी संबंधितांना निवेदन पाठवून तातडीने नवीन परीपत्रक काढण्याची मागणी केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) १ सप्टेंबर २०२५ च्या निर्णयानुसार सर्व शिक्षकांना ३० ऑगस्ट २०२७ पर्यंत टीईटीपरीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक करण्यात आले आहे. अन्यथा सक्तीची सेवानिवृत्ती स्वीकारावी लागणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद व अनुदानित शाळांतील अनेका शिक्षकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.
इंग्रजी टाळण्यासाठी काही शिक्षकांचा हिंदी माध्यमाकडे कल
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, मराठी माध्यमातील काही शिक्षकांनी इंग्रजी विषय टाळण्यासाठी हिंदी भाषा निवडून टीईटी पास होण्याची पळवाट शोधली आहे. पेपर १ व पेपर २ मध्ये इंग्रजीऐवजी हिंदी निवडून परीक्षा देत असल्याने ते सहज उत्तीर्ण होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे परीक्षेची उद्दिष्टे, गुणवत्ता आणि पारदर्शकता धोक्यात येत असल्याची गंभीर
बाब पुढे आली आहे. मराठी माध्यमातील शिक्षकांसाठी पेपर १ मध्ये मराठी, इंग्रजी, परिसर अभ्यास, गणित व मानसशास्त्र तर पेपर २ मध्ये मराठी, इंग्रजी, मानसशास्त्र व समाजशास्त्र किंवा गणित-विज्ञान हे विषय अनिवार्य असणे अपेक्षित आहे. मात्र प्रत्यक्षात इंग्रजीऐवजी हिंदी निवडण्याची मुभा मिळत असल्याने नियमांचे उल्लंघन होत असल्याचे बंब यांनी नमूद केले आहे.
हे देखील वाचा : सुनेत्रा पवार अॅक्शन मोडमध्ये; महिलांसाठी केली ‘या’ योजनेची घोषणा
मूळ माध्यमानुसार परीक्षा बंधनकारक
यामुळे मराठी माध्यमातील शिक्षकांसाठी इंग्रजी भाषा सक्तीची करण्यात यावी, सर्व शिक्षकांनी त्यांच्या मूळ माध्यमानुसारच परीक्षा देणे बंधनकारक करावे आणि या संदर्भात नवीन परीपत्रक काढून सर्व पळवाटा तातडीने बंद कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकता, गुणवत्ता आणि न्याव्यता टिकवण्यासाठी शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशीही मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
हे देखील वाचा : “हे परराष्ट्र धोरणाचे अपयश..! गॅस तुटवड्यावरुन विरोधकांचा मोदी सरकारवर निशाणा
नोकरीच्या आमिषाने फसवणूक !
ऑनलाईन नोकरीच्या आमिषाने एका नागरिकाची १ लाख ४० हजार २९९ रुपयांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली असून पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे त्यापैकी ५५ हजार ५०० रुपये तक्रारदाराला परत मिळवून देण्यात यश आले आहे.
पोलीस स्टेशन मरखेल (जि. नांदेड) येथे २७ जानेवारी २०२५ रोजी नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलवर तक्रार क्रमांक ३१९०१२५००१५०७७ अन्वये ऑनलाईन फसवणुकीची तक्रार प्राप्त झाली होती. तक्रारदार सोशल मीडियावर व्हिडिओ पाहत असताना त्यांना घरबसल्या ऑनलाईन काम करून पैसे मिळवून देणाऱ्या नोकरीची जाहिरात दिसली होती.






