ठाण्यातील घोडबंदर रोडवर रविवारी भीषण अपघात झाल्याचं समोर आला आहे. या अपघातामध्ये २१ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला. ही घटना नागला बंदर परिसरात रात्री १० वाजता झाली. तरुणी कॅडबरी जंक्शनजवळ दुचाकीवरून जात असताना ती डंपरखली आली आणि तरुणीच्या शरीराचे थेट दोन तुकडे झाले. मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव गजल टुटेजा असे नाव आहे. ती घोडबंदर परिसरातील एका सोसायटीत राहत होती. गजल ही तिच्या कुटुंबातील एकटी कमावणारी होती. तिच्या मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
गजलच्या भावाने सांगितले अंगावर काटा आणणारा प्रसंग
गजल तुटेजा ही ठाण्यातील एका खासगी कंपनीत कामाला होती. तिला वडील नसल्यामुळे घराची जबाबदारी तिच्या खांद्यावर होती. तिच्या घरात आई आणि लहान भाऊ होता. घराचा गाडा ओढण्यासाठी गजल ही नोकरीसोबत पोळीभाजीचा व्यवसायही करायची. प्रचंड कष्ट करुन तिने आपल्या घराचा आर्थिक गाडा रुळावर आणला होता. गजलचा तिच्या लहान भावावर प्रचंड जीव होता. 12 तारखेल अपघाताच्या दिवशी गजलने तिचा भाऊ अक्की याला बाहेर जेवायला जाऊ असे सांगितल होते. मी दोन मिनिटांत घराच्या खाली येतेय, तू खाली ये, आपण मस्त जेवायला जाऊयात, असे गजल म्हणाली होती. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच गजलचा अपघात झाला.
गजलचा भाऊ अक्की याने रस्त्यावर पडलेला आपल्या बहिणीचा मृतदेह पाहिला. तो पेट्रोल पंपाजवळ बहिणीची वाट पाहत होता. तेव्हा त्याला रस्त्यावर प्रचंड गर्दी दिसली. तिथे जाऊन पाहिल्यानंतर अक्कीला त्याच्या बहिणीचा मृतदेह दिसला. त्याने सांगितले की, ‘मी खाली गेलो, दिदीला खूप फोन लावले, पण तिने फोन उचलला नाही, थोडे पुढे गेलो तेव्हा तिथे गर्दी दिसली मी त्या गर्दीतून वाट काढत गेलो. तेव्हा मला दिसले की, दीदीच्या अंगावरुन डंपर गेला होता तिच्या शरीराचे दोन तुकडे झाले होते. मी लगेच आईला फोन केला’, असे अक्की तुटेजा याने सांगितले.
गजलच्या मृतदेहाला कोणीही हात लावण्यासाठी तयार नव्हते तिचा भाऊ आणि आई घटनास्थळी आल्यानंतर आईने एका चादरीत गजलचा मृतदेह उचलून रुग्णवाहिकेत ठेवला. तिला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तिने जागेवरच प्राण सोडले.