सौजन्य - नवराष्ट्र टीम
शिक्रापूर : शिरुर शहरात कमरेला बेकायदेशीरपणे पिस्तुल लावून फिरणाऱ्या सराईत गुन्हेगाराच्या मुसक्या आवळल्या आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला आरोपीला पकडण्यात यश आले आहे. निखील सतीश थेऊरकर असे पोलिसांनी जेरबंद केलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे.
शिरुर शहरात रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असलेला निखील थेऊरकर हा कमरेला बेकायदेशीरपणे पिस्तुल लावून फिरत असल्याची माहिती गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला मिळाली, त्यांनतर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, शिरुरचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ, पोलीस हवालदार तुषार पंदारे, जनार्दन शेळके, संजय जाधव, राजू मोमीन, मंगेश थिगळे यांनी शिरुर शहरात सापळा रचत शिरुर येथील बाह्य वळण रस्त्यालगत निखील यास ताब्यात घेतले.
आरोपीची झडती घेतली असता त्याच्या कमरेला पिस्तुल मिळून आला, दरम्यान पोलिसांनी त्याच्याजवळील पिस्तुल व दोन जिवंत काडतुसे जप्त करत निखील सतीश थेऊरकर (वय २१ वर्षे रा. करडे ता. शिरुर जि. पुणे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास शिरुर पोलीस करत आहे.
हे सुद्धा वाचा : पुण्यात चोरट्यांचा धुमाकूळ; कर्वेनगरमधील बंगला फोडून लाखोंचा ऐवज चोरला
गुन्हेगारांचा सूळसुळाट
अवैधरित्या पिस्तूल बाळगणाऱ्यांची संख्या वाढली आहे. तरुण गुन्हेगारीतील आकर्षण तसेच दहशतीसाठी पिस्तूल घेऊन फिरत असल्याचे दिसत आहे. त्यासोबतच सराईत गुन्हेगार भितीपोटी देखील पिस्तूल बाळगत असल्याचे समोर आलेले आहे. यापार्श्वभूमवीर पोलिसांकडून गस्तीवर भर देण्यात आलेला आहे.
पुणे विमानतळावर पिस्तुलासह २८ काडतुसे जप्त
दरम्यान गेल्या काही दिवसाखाली लोहगाव येथील विमानतळावर प्रवाशाकडून पिस्तुल जप्त करण्यात आले आहे, हैदराबादला प्रवासी निघाला होता. तो पिशवीत पिस्तुल आणि तब्बल २८ काडतुसे घेऊन जात असताना ही कारवाई करण्यात आली. विमानतळावरील सुरक्षा विभागाने कारवाई केली आहे. त्यांनी प्रवाशाला पकडून पोेलिसांच्या ताब्यात दिले. दीपक सीताराम काटे (वय ३२, रा. सराटी, ता. इंदापूर, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या प्रवाशाचे नाव आहे. याबाबत इंडिगो एअरलाइन्सचे सुरक्षा अधिकारी प्रीती भोसले यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, प्रीती भोसले ३ जानेवारी रोजी पावणेअकराच्या सुमारास प्रवाशांच्या पिशव्यांची तपासणी करत होत्या. काटे हे इंडिगो एअरलाइन्सच्या विमानातून हैदराबादला जाणार होते. प्रवाशांच्या सामानाची तपासणी करण्यात येत होती. त्यावेळी धातूशोधक यंत्राकडून (मेटल डिटेक्टर) केल्या जाणाऱ्या तपासणीत काटे यांच्या पिशवीत पिस्तूल, दोन मॅगझीन, तसेच २८ काडतुसे सापडली. याबाबत काटे यांच्याकडे विचारणा केली. तेव्हा त्यांनी माहिती देण्यास नकार दिला. त्यांनी पिस्तूल का बाळगले ? यादृष्टीने तपास करण्यात येत आहे. पोलीस उपनिरीक्षक संदीप करपे तपास करत आहेत.