सौजन्य - नवराष्ट्र टीम
मुंबई : आज भारती एअरटेलने जाहीर केले की, त्यांच्या फसवणूकविरोधी उपक्रमांमुळे सायबर गुन्ह्यांच्या तक्रारींमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे आणि यास गृह मंत्रालयाच्या (MHA) अंतर्गत भारतीय सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटर (I4C) कडून प्राप्त ताज्या माहितीद्वारे आणखी पुष्टी मिळाली आहे.
MHA-I4C नुसार, एअरटेल नेटवर्कवरील आर्थिक नुकसानीच्या मूल्यात तब्बल 68.7% घट झाली आहे आणि एकूण सायबर गुन्ह्यांच्या घटनांमध्ये 14.3% घट झाली आहे. त्यामुळे सायबर गुन्हे रोखण्यासाठी आणि ग्राहकांसाठी सुरक्षित नेटवर्क निर्माण करण्यासाठी एअरटेलच्या फसवणूक आणि स्पॅम शोध उपाययोजनेची प्रभावकारिता सिद्ध झाली आहे. MHA-I4C ने केलेल्या विश्लेषणात, सप्टेंबर 2024 (जेव्हा एअरटेलची फसवणूक आणि स्पॅम शोध उपाययोजना सुरू झाली नव्हती) आणि जून 2025 मधील महत्त्वाचे सायबर गुन्हे दर्शक तुलनात्मक स्वरूपात मांडले आहेत.
या उपक्रमाबद्दल भाष्य करताना भारती एअरटेलचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक गोपाल विठ्ठल म्हणाले, “आमच्या ग्राहकांसाठी स्पॅम आणि आर्थिक फसवणुकींचे उच्चाटन करणे हे आमचे ध्येय आहे. मागील एका वर्षात, आमच्या AI-सक्षम नेटवर्क उपाययोजनांनी 48.3 अब्जांहून अधिक स्पॅम कॉल्स ओळखले आहेत आणि 3.2 लाख फसव्या लिंक ब्लॉक केल्या आहेत. तथापि, आम्ही याकडे एका मोठ्या लढ्यातील छोटा टप्पा म्हणून पाहतो. आमचे नेटवर्क्स डिजिटल स्पॅम आणि स्कॅमपासून पूर्णपणे मुक्त होईपर्यंत आम्ही या क्षेत्रात सातत्याने नवनवीन प्रयोग करत राहू आणि मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करू.”
“भारतीय सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटर (I4C) – गृह मंत्रालय (MHA) यांनी सामायिक केलेला परिणाम आम्हाला प्रचंड प्रेरणा देतो आणि या मोहिमेत आमच्या प्रयत्नांना मान्यता देतो. स्पॅम आणि फसवणूकीला आळा घालण्यासाठी केलेल्या उपक्रमांबद्दल मी MHA I4C आणि DoT यांचे कौतुक करतो आणि सायबर गुन्हे व फसवणुकीच्या धोक्यांचे उच्चाटन करण्यासाठी आम्ही अधिकाऱ्यांशी सखोल सहकार्य करण्यास उत्सुक आहोत.”, असे विठ्ठल यांनी पुढे सांगितले.
सप्टेंबर 2024 मध्ये, देशातील स्पॅमच्या समस्येला आळा घालण्यासाठी एक क्रांतिकारी पाऊल उचलत, कंपनीने भारतातील पहिली नेटवर्क-आधारित AI-सक्षम स्पॅम शोध उपाययोजनेची सुरूवात केली. यामुळे स्पॅम कॉल्स आणि संदेशांच्या वाढत्या समस्येचे निराकरण करण्यास मोठी मदत झाली. ग्राहकांना संशयास्पद स्पॅम कॉल्स आणि SMS बद्दल वास्तविक वेळेत सतर्क करणारी ही उपाययोजना देशातील कोणत्याही दूरसंचार सेवा प्रदात्याकडून सादर केलेली पहिलीच ठरली. याच पुढाकाराचा भाग म्हणून, मे 2025 मध्ये कंपनीने जगातील पहिली अशी उपाययोजना सादर केली जी नेटवर्कवरील सर्व प्रकारच्या संवादांमधील दुर्भावनापूर्ण लिंक वास्तविक वेळेत शोधून त्यांना थांबवते. ही सुरक्षित सेवा सर्व एअरटेल मोबाईल आणि ब्रॉडबँड ग्राहकांसाठी कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय अखंडितपणे समाविष्ट केली गेली आहे आणि स्वयंचलितपणे सक्षम केली गेली आहे.
I4C च्या विश्लेषणातून मिळालेल्या निष्कर्षांनी एअरटेलने आपल्या ग्राहकांसाठी केलेल्या या सक्रिय उपाययोजनांची परिणामकारकता अधोरेखित केली आहे.