सौजन्य - नवराष्ट्र टीम
पुणे : वर्षभरापूर्वी पुण्यात झालेल्या वनराज आंदेकर याच्या हत्येचा बदला म्हणून आंदेकर टोळीने आयुष कोमकरला संपवले आहे. 5 सप्टेंबरला गणेश विसर्जनाच्या आदल्या रात्री आठ वाजता पुण्यातील नाना पेठ परिसरात दोन मारेकऱ्यांनी आयुष कोमकर याच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला होता. सीसीटीव्ही फुटेजमध्ये मारेकऱ्यांची ओळख पटली असून, त्यांची नावे यश पाटील आणि अमित पाटोळे अशी आहेत. पुणे पोलिसांनी आयुष कोमकर हत्याप्रकरणात संपूर्ण आंदेकर कुटुंबावर गुन्हा दाखल केला आहे. आयुषच्या हत्येनंतर पुन्हा एकदा पुण्याच्या नाना पेठेत दहशत माजवणाऱ्या आंदेकर टोळीचा रक्तरंजित इतिहास समोर आला आहे.
नाना पेठ परिसरात आपली दहशत निर्माण करणार्या आंदेकर टोळीचा इतिहास हा रक्तरंजितच आहे. पुणे शहरात पूर्वी अनेक छोट्या मोठ्या टोळ्या होत्या. त्यात बाळकृष्ण ऊर्फ बाळु आंदेकर याची टोळी होती. मटका, जुगार, गावठी दारुची विक्री करुन त्यातून पैसा कमावणे हे प्रामुख्याने या टोळ्यांचे उद्योग असायचे. या टोळ्या एकमेकांवर हल्ला करण्यासाठी सायकलची चैन, तलवारी, रामपूरी चाकू, सोडा वॉटरच्या बाटल्या यांचा वापर करायचे.
आंदेकर आणि माळवदकर यांची सुरुवातीला एकच टोळी होती. वादातून प्रमोद माळवदकर वेगळा झाला. 1980 च्या दशकात बाळु आंदेकर आणि प्रमोद माळवदकर या दोन टोळ्यांमध्ये वर्चस्वाची लढाई सुरु झाली. आंदेकर टोळीने प्रमोद माळवदकर याच्या वडिलांचा खून केला. त्याचा बदला घेण्यासाठी माळवदकर टोळीने शिवाजीनगर येथील कोर्टाच्या आवारात बाळू आंदेकर याचा 17 जुलै 1984 रोजी खून केला. त्यातून या दोन टोळ्यांमधील गँगवॉर आणखीच भडकले. पुणे शहरातील आतापर्यंतचे हे भीषण गँगवॉर होते. या गँगवॉरमध्ये 6 गुंड मारले गेले होते.
पुणे शहर पोलीस दलातील गुन्हे शाखेच्या पथकाने काळेवाडी येथे 19 नोव्हेंबर 1997 रोजी पहाटे प्रमोद माळवदकर याचा इन्काऊंटर केला. प्रमोद माळवदकर याच्या मृत्युनंतर माळवदकर टोळी जवळपास नामशेष झाली. त्यातून माळवदकर–आंदेकर टोळीयुद्ध थांबले असले तरी आंदेकर टोळी मात्र वेगाने वाढू लागली होती. बाळू आंदेकर याच्यानंतर सूर्यकांत ऊर्फ बंडु आंदेकर याच्याकडे आंदेकर टोळीची सुत्रे गेली. इतके दिवस केवळ गुन्हेगारी विश्वातच ही टोळी आपले वर्चस्व राखून होती.
आंदेकरांचा राजकारणात प्रवेश
१९९७ मध्ये महापालिकेच्या निवडणुका आल्या. या निवडणुकीद्वारे आंदेकर टोळीने थेट राजकारणात प्रवेश केला. या टोळीशी संबंधित चार जण निवडून आले होते. त्यातून पुढच्याच वर्षी 1998- 99 मध्ये वत्सला आंदेकर यांची पुण्याच्या महापौरपदी निवड करण्यात आली होती. वत्सला आंदेकर या अक्का म्हणून ओळखल्या जायच्या. राजकारणात प्रवेश केल्यानंतर त्यांनी गुन्हेगारी क्षेत्रातील आपल्या निकटवर्तीयांशी संबंध कमी केले.
बंडू आंदेकरवर फरासखाना पोलीस स्टेशनशी संबंधित खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा झाली. तुरुंगात गेल्याने टोळी कमकुवत झाली, पण वनराज आणि कृष्णा आंदेकरने (बंडूचे मुलगे) व्यवसाय चालवला. २००९ मध्ये दोघांनाही शहराबाहेर हाकलण्यात आलं. बंडू बाहेर आल्यावर टोळी पुन्हा वाढली, पण इतर टोळ्यांशी संघर्ष वाढला.
वनराज आंदेकरची हत्या
१ सप्टेंबर २०२४ रोजी नाना पेठेतील दोके तालिमजवळ वनराज आंदेकरची निर्घृण हत्या झाली. रात्री ९ वाजता तरुणांनी सहा बाईकवर येऊन हल्ला केला. पाच गोळ्या झाडल्या, कोयत्याने डोके फोडले. हल्लेखोरांनी रस्त्याची वीज बंद केली आणि वनराजला वेढा घातला. तो जागीच ठार झाला. बहिणीनच वनराज आंदेकरच्या खून प्रकरणात सहभागी असल्याचे उघड झाले.
वनराजच्या हत्येचा घेतला बदला
आता पुन्हा एकदा गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला, नाना पेठेत रक्त सांडले. १८ वर्षीय आयुष गणेश कोमकर (वनराजचा नातू आणि गणेश कोमकरचा मुलगा) ट्यूशननंतर घरी परतत असताना बेसमेंट पार्किंगमध्ये दोन बाईकवर आलेल्या हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या. शरीरातून ९ गोळ्या बाहेर पडल्या, तो जागीच ठार झाला. या हत्येनेच वनराजच्या खूनाचा बदला पूर्ण झाला आहे.