ज्वेलर्समधून २० लाखांचे सोन्याचे दागिने लंपास (संग्रहित फोटो)
मोहोळ : पंढरपूर रोडवर शुक्रवारी (दि.९) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास पोलिस असल्याचा बनाव करून पती-पत्नीच्या अंगावरील सव्वा तीन लाखांचे सोन्याचे दागिने लांबवण्याची घटना घडली आहे. ही घटना मोहोळ शहरापासून अवघ्या काही अंतरावर काळे पंपाच्या पुढे घडली आहे. पोखरापूर येथील जयश्री लक्ष्मण दळवी यांनी मोहोळ पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे, यावरुन अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जयश्री दळवी व त्यांचे पती लक्ष्मण दळवी हे मोटरसायकलवरून तुळजापूर येथे लग्नकार्यासाठी गेले होते. लग्न संपवून ते आपल्या गावी पोखरापूरकडे परतत असताना मोहोळपासून काही अंतरावर काळे पेट्रोल पंपाच्या नजीक दोन मोटरसायकलस्वारांनी त्यांना थांबवले. त्यांनी सांगितले की, “आम्ही पोलिस आहोत, पुढे कारवाई चालू आहे, तुमच्याकडील सोनं काढून खिशात ठेवा.”
कागदाची गुंडली देऊन दागिने लंपास
हे ऐकून विश्वास ठेवून जयश्री आणि लक्ष्मण दळवी यांनी आपल्या अंगावरील सोन्याचे दागिने काढून चोरट्यांना दिले. त्याची किंमत ३ लाख २० हजार रुपये होती. चोरट्यांनी ते कागदात बांधून दिल्याचे सांगून दागिने परत दिले. काही वेळाने, लक्ष्मण दळवी यांनी कागद उघडून पाहिले असता, त्यात त्यांचे सोन्याचे दागिने नसून दुसरीच कागदाची गुंडाळी होती. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच दळवी दाम्पत्याने मोहोळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून चार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, मोहोळ पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आहे.