फोटो सौजन्य - Social Media
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त राज्यभरातील विभागीय कार्यालये, आगार आणि बसस्थानक परिसरात विशेष वृक्षारोपण अभियान राबविण्यात आले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाअंतर्गत बुलढाणा विभागीय कार्यालय आणि देऊळगाव राजा बसस्थानक येथेही वृक्षारोपण करण्यात आले.
बुलढाणा विभागीय कार्यालयात विभाग नियंत्रक शुभांगी शिरसाठ यांच्या हस्ते स्थानिक प्रजातींच्या आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या वृक्षांची लागवड करण्यात आली. यावेळी विभागीय वाहतूक अधिकारी दिगंबर जाधव, सुरक्षा व दक्षता अधिकारी जयंत कांडेलकर, विभागीय कर्मचारी वर्ग अधिकारी राहुल तांबडे, विभागीय लेखा अधिकारी अनिल बहिरम, विभागीय वाहतूक अधीक्षक गोविंद जंजाळ यांच्यासह विभागातील अनेक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
दरम्यान, देऊळगाव राजा बसस्थानकातही वर्धापन दिनानिमित्त वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते घनशीराम शिपणे होते. महाराष्ट्र राज्य प्रवासी कल्याण संस्थेचे प्रा. विनायकराव कुलकर्णी यांनी एसटी महामंडळाच्या कार्याचा आढावा घेत प्रवाशांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. या कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष संतोष खांडेभराड, दादाराव खारडे, गटशिक्षणाधिकारी दादाराव मसुदवाले, रामदास डोईफोडे, संतोष पुजारी, रंजीत काकड, नगरसेवक नासिरभाई, तेजराव मुंडे, पोलिस उपनिरीक्षक नारायण गीते, शहर दामिनी पथक प्रमुख जयश्री काकड यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
एसटी महामंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देतानाच वृक्षलागवडीचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. भविष्यातही अशा उपक्रमांद्वारे पर्यावरण संरक्षणासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.






