संग्रहित फोटो
पुणे : पुण्यासह राज्यभरात गुन्हेगारी वाढली असून, दररोज टोळके वेगवेगळ्या भागात दहशत माजवत आहेत. अशातच आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. सहकारनगर भागातील मल्हार मार्तंड सोसायटीत टोळक्याने दहशत माजवून चार कारची तोडफोड केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी १८ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. टोळक्यांनी सोसायटीत घुसून तोडफोड केल्याने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले होते. याबाबत निलेश उमेश मोहिते (वय ३८, रा. मल्हार मार्तंड सोसायटी, सहकारनगर क्रमांक एक, पद्मावती) यांनी सहकारनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांनुसार, टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, मल्हार मार्तंड सोसायटीच्या आवरात सोमवारी (१३ जुलै) मध्यरात्री एकच्या सुमारास वेगवेगळ्या दुचाकीवरुन टोळके आले. त्यांनी सोसायटीतील रहिवाशांना शिवीगाळ केली. आरडाओरडा करुन चोरट्यांनी शस्त्रे उगारली. सोसायटीच्या आवारात लावलेल्या चार कारच्या काचा फोडून दहशत माजविली. टोळके दुचाकीवरुन पसार झाले.
या घटनेची माहिती मिळताच सहायक आयुक्त गजानन पवार, वरिष्ठ निरीक्षक विठ्ठल पवार यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी सोसायटीच्या आवारातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असून, पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. सहायक पोलीस निरीक्षक श्रीकांत संघर्षी तपास करत आहेत.
पुण्यात सासरच्याकडून जावयाला मारहाण
पत्नी आणि मुलाला भेटण्यासाठी सासरी गेलेल्या तरुणाला जुन्या वादातून सासरच्या नातेवाईकांनी बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. मेव्हण्याने हातातील लायटरने नाकावर वार केल्याने जावयाच्या नाकाचे हाड फ्रॅक्चर होऊन तो गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी अकबर खान, अकबर युसूफ खान आणि मोईन अकबर खान (सर्व रा. संपन्न हाइट्स, मिठानगर, कोंढवा) यांच्यावर पुण्यातील कोंढवा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत रिझवान राजअहमद शेख (वय २६, रा. महविया हाइट्स, मिठानगर, कोंढवा) यांनी तक्रार दिली आहे. ही घटना ११ जुलै रोजी रात्री सव्वा ते साडेदहा वाजण्याच्या दरम्यान मिठानगर येथील संपन्न हाइट्स इमारतीच्या पार्किंगमध्ये घडली आहे. पोलीसांच्या माहितीनुसार, तक्रारदार रिझवान हे पत्नी व मुलाला भेटण्यासाठी सासरी गेले होते. तेथे जुन्या वादाच्या कारणावरून सासरच्या नातेवाईकांनी त्यांना शिवीगाळ केली. रिझवान तेथून निघून आल्यानंतर आरोपी अकबर युसूफ खान याने फोनवरून शिवीगाळ सुरू केली. याबाबत जाब विचारण्यासाठी रिझवान पुन्हा तेथे गेले असता मेव्हणा मोईन अकबर खान याने हातातील फायटरने त्यांच्या नाकावर व डोक्यात मारहाण केली. या हल्ल्यात त्यांच्या नाकाचे हाड फ्रॅक्चर होऊन ते गंभीर जखमी झाले. याप्रकरणाचा पुढील तपास कोंढवा पोलिस करत आहेत.






