संग्रहित फोटो
पिंपरी : सराईत गुन्हेगाराने साथीदारांच्या मदतीने एकावर खुनाचा प्रयत्न केला. ही घटना रविवारी (दि. २२) काळेवाडी येथे घडली. दरम्यान, शहरातील एका बड्या नेत्याने स्थानिक पोलिसांवर दबाव टाकल्याने सराईत गुन्हेगाराचे नावच गुन्ह्यातून वगळले. याबाबत माहिती मिळताच पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी संबंधित गुन्हेगाराला तात्काळ बेड्या ठोकण्याचे आदेश दिले. तसेच, राजकीय दबावाला बळी पडणाऱ्या पीएसआयचे तडकाफडकी निलंबन देखील केले.
नेमकं काय आहे प्रकरण?
आरोपी प्रशांत दिघे हा पिंपरी- चिंचवड शहरातील एक कुख्यात गुन्हेगार आहे. त्याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, हत्यारबंदी, जबरी चोरी यांसारखे १९ गंभीर गुन्हे दाखल आहेत. रविवारी (दि. २२) रात्री काळेवाडी येथे दोन गटात हाणामारी झाली. यामध्ये आरोपीने एका व्यक्तीचा खुन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, राजकीय हस्तक्षेपामुळे पीएसआय सचिन चव्हाण यांनी त्याचे नाव गुन्ह्यातून वगळले होते.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भूमिकेचे स्वागत
या प्रकरणाची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना मिळताच त्यांनी तातडीने कारवाई करत चव्हाण यांना निलंबित केले. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राजकीय दबावाला न जुमानता कठोर पावले उचलल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
हे सुद्धा वाचा : Pune Crime : पुण्यात चोरट्यांचा सुळसुळाट; कोथरूडमध्ये महिलांचे दागिने चोरले
लोकप्रतिनिधीकडून आरोपांच्या फैरी
आपण सांगूनही कारवाई केल्याचा राग आल्याने संबंधित लोकप्रतिनिधीने पोलिस प्रशासनावर पक्षपातीपणाचा आरोप केला आहे. तसेच, पोलिस हप्तावसुली करत असल्याचेही जाहीररीत्या सांगितले. मात्र, वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी राजकीय दबाव झुगारल्याने आरोप होत समोर आल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली.
दोन तरुणांवर कोयत्याने वार
गेल्या काही दिवसाखाली भरदुपारी कर्वे रस्त्यावरील प्रसिद्ध महाविद्यालय परिसरात फिल्मीस्टाईल टोळक्याने हातात कोयते घेऊन पाठलाग करत दोन तरुणांवर कोयत्याने वार केले. यात एका तरुणाची प्रकृती चिंताजनक असून, त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तर, दुसऱ्याला डोक्यात वार करून जखमी केले आहे. भरदुपारी घडलेल्या याघटनेमुळे महाविद्यालय परिसरात चांगलाच गोंधळ निर्माण झाला होता. धक्कादायक म्हणजे, मैत्रिणीबद्दल अफवा पसरवतोय या संशयावरून टोळक्याने वार केले आहेत. घटनेची माहिती मिळताच परिमंडळ एकचे उपायुक्त संदिपसिंह गिल्ल व डेक्कन पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जखमी असलेल्या तरुणांकडे चौकशी केली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, पसार झालेल्या तरुणांचा शोध घेतला जात आहे.