कुलूप तोडून सोन्याचे दागिने लंपास (संग्रहित फोटो)
गंगाखेड : शहर व तालुक्यात चोरट्यांचा सुळसुळाट सुरुच आहे. चोरट्यांकडून सोन्याच्या दागिन्यांना लक्ष्य केले जात असून, एकाच आठवड्यात चोरीच्या दोन घटना घडल्या आहेत. शहरातील मन्नाथनगर येथे भाड्याच्या घरात राहणारे केशव देवकते यांच्या घराच्या दरवाज्याचे कुलूप तोडून 12 ग्रॅम सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यानी लांबवल्याची घटना बुधवारी सायंकाळच्या सुमारास घडली.
केशव देवकते यांनी गुरुवारी (दि.२६) याबाबत तक्रार दिली आहे. या दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल केला आहे. शहरातील मन्नाथनगरात राहणारे केशव देवकते गंगाखेड येथील बस आगरात वाहक आहेत. बुधवारी सायंकाळी चार वाजता देवकते कुटुंब आपल्या गावी डोगरपिंपळा येथे गेले होते. दरम्यान, त्यांना गुरुवारी दुपारच्या सुमारास घरमालकाचा फोन आला, तुमच्या दरवाज्याचे कुलूप तुटलेले दिसत असून, दरवाजा उघडा आहे, असे सांगितल्यानंतर केशव देवकते मन्नाथनगर येथे घरी आले. त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसला.
तसेच कुलूप तोडलेले आढळले. घरात सामान अस्ताव्यस्त फेकलेले दिसले. भिंतीला असलेल्या रॅकमध्ये ठेवलेले सोन्याचे मंगळसूत्र किंमत १३ हजार ३५० रुपये, साडेतीन ग्रॅमची सोन्याची ठुसी, सात ग्रॅम वजनाचे सोन्याचे झुंबर असे मिळून ५० हजार ८५० रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यानी लांबवले. केशव देवकते यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल केला आहे.
गोपा शिवारात शेतातील आखाड्यावर चोरी
तालुक्यातील गोपा शिवारात शेतातील आखाड्यावर राहणारे सुरवसे दाम्पत्याला चोरट्याने मारहाण करून १ लाख २० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले. ही घटना सोमवारी रात्री एकच्या सुमारास घडली. यात ज्ञानेश्वर सुरवसे याच्या डोक्याजवळ धारदार शस्त्राने मारल्याने गंभीर जखमी झाले होते.
मारहाणीची पोलिसांत तक्रार
ज्ञानेश्वर सुरवसे यांनी याबाबत पोलिस ठाण्यात दिली. या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरट्यानी सोन्याच्या दागिन्यावर लक्ष केले असून, एका आठवड्यात झालेल्या दोन चोरीच्या घटनांनी नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण होत आहे.