संग्रहित फोटो
पुणे : प्रेमसंबंधाच्या संशयातून असिस्टंट मॅनेजर तरुणाला बंदूक दाखवून, कमरेचा पट्टा व लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. तर, पोलिस चौकीच्या बाहेर एक मुलगी उभी आहे, ती तुझ्याविरोधात खोटी तक्रार करणार आहे, तुला अडचणीत आणेल अशी धमकीही दिली. ही धक्कादायक घटना २१ जून रोजी रात्री साडेआठ वाजता वाघोलीतील सेंट जोसेफ कॉन्वेंट स्कूलच्या मैदानात घडली आहे. याप्रकरणी २८ वर्षीय तरुणाने वाघोली पोलिसांत तक्रार दिली आहे. पोलिसांनी आदर्श चौधरी (२४, रा. लोणावळा) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, तरुण विमाननगरमधील खाजगी कंपनीत असिस्टंट मॅनेजर आहे. कंपनीतील एका तरुणीच्या ओळखीतून त्याची आदर्श चौधरीशी एप्रिल २०२५ मध्ये ओळख झाली होती. नंतर दोघांत काहीही संपर्क नव्हता. २१ जून रोजी कंपनीतून बाहेर आला असता त्याला येथे आदर्श आल्याचे समजले. त्याने आदर्शला फोन करून भेट घेतली. त्यानंतर दोघं एकत्र दुचाकीवरून वाघोलीच्या सेंट जोसेफ स्कूलच्या मोकळ्या मैदानात गेले.
तेथे आदर्शने आधी बोलण्यास सुरुवात केली. नंतर मात्र अचानक रागाने म्हणाला, “माझे तिच्यासोबतचे प्रेमसंबंध संपले, आणि त्याला तू कारण आहेस. मी तुझ्या आयुष्याची वाट लावणार !” असे म्हणून त्याने लाथाबुक्क्यांनी त्याला मारहाण केली. कमरेचा बेल्ट काढून मारले. यावेळी त्याने बंदूक दाखवत धमकी दिली की, “तुला इथे मारले, तर कोणालाही कळणार नाही. तुझ्या घरचा पत्ता काढू शकतो.”
एवढ्यावर न थांबता, त्याने आणखी एक खेळी खेळली. म्हणाला, “विमाननगर पोलिस चौकीबाहेर एक मुलगी उभी आहे, ती तुझ्याविरुद्ध खोटी तक्रार करणार आहे.” मारहाणीनंतर आरोपी तेथून दुचाकीवरून निघून गेला. जखमी अवस्थेत तरुणाने त्याच्या मित्राला बोलावले व घरी जाऊन उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल झाला. उपचारानंतर त्याने पोलिसांत तक्रार दाखल केली.