संग्रहित फोटो
पुणे : चंदननगर पोलिस ठाण्याच्या नवीन सुसज्ज आणि प्रशस्त इमारतीचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर पुण्यातील गुन्हेगारांनी त्याच पोलिस ठाण्याच्या हद्दीत भरदुपारी सराफी दुकानात घुसून चोरट्यांनी लुटापाट करत चोरी केली आहे. या धक्कादायक घटनेनंतर शहरात चांगलीच खळबळ उडाली. गृहमंत्री पुण्यात अन् पोलिसांच्या कार्यक्रमाला हजेरी लावत असताना हा प्रकार घडल्याने पोलिस दलातही चांगलेच वातावरण गरमागरम झाले होते. चोरट्यांनी तीक्ष्ण हत्यारे दाखवत तीन ग्रॅम वजनाचे दागिने चोरून नेल्याचे सांगण्यात आले आहे. याप्रकरणी चंदननगर पोलिस ठाण्यात राजेंद्रसिंग देवडा (वय ५७) यांनी तक्रार दिली आहे. त्यावरून रात्री उशिरापर्यंत अज्ञातांविरूद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
पोलिसांच्या माहितीनुसार, चंदननगर परिसरात साईनाथनगर हा व्यापारी परिसर आहे. मुख्य रस्त्यावरच देवडा यांचे ‘श्री आशापुरी ज्वेलर्स’ हे दुकान आहे. नेहमीप्रमाणे दुपारी साडे बारा ते एकच्या सुमारास ते दुकानाच्या काऊंटरवर बसले होते. तेव्हा दुचाकीवरून चेहऱ्याला मास्क लावून तिघेजन दुकानात शिरले. त्यांनी थेट तीक्ष्ण हत्यारे दाखवत लुटपाट सुरू केली. त्यांनी या गोंधळात तीन ग्रॅमच्या तीन वेगवेगळ्या कानात घालायच्या बाळ्या हाती लागल्या. देवडा यांनी चोरट्यांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला आणि आरडाओरडा सुरू केला. त्यांनी स्टुल अंगावर फेकत मोठ्या आरडाओरडा केल्याने चोरटे घाबरले. ते पळत बाहेर आले आणि दुचाकीवरून पसार झाले. आरडाओरडा झाल्याने नागरिकांनी धावपळ सुरू केली. चोरट्यांचा पाठलाग देखील केला. मात्र, दुचाकीवरून पसार होण्यात यशस्वी झाले. अधिक तपास पोलिस करत आहेत.
गजबजलेल्या परिसरात भरदुपारचा थरार
साईनाथनगर परिसर हा सतत गजबजलेला असतो. मुख्य रस्ता आणि या दुकानासमोरूनच पुर्ण रहदारी देखील असते. ही रहदारी मोठी असते. त्यामुळे सहसा वाहने चालविताना देखील वेग कमी असावा लागतो. परंतु, त्याही स्थितीत चोरट्यांनी ही लुट केल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे.
नवीन पोलिस ठाण्याच्या इमारतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन आणि काही तासांनीच त्याच पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारांनी भरदिवसा सराफी दुकानावर दरोडा टाकला. तेथून जास्त सोने गेले नसले किंवा पिस्तुल दाखवून धमकावले नसले तरी भरदिवसा दरोडा पडल्याने खळबळ उडाली आहे.